दिमापूर मध्ये आहे भीम व घटेात्कचाचा सारीपाट


भारताच्या पूर्वोत्तर राज्यातील एक नितांतसुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेले नागालँड हे राज्य अनेक सुंदर पर्यटनस्थळांनी युक्त आहे याची अनेकांना कल्पना नाही. नागालँडमधील दिमापूर शहरात तर महाभारताशी निगडीत अनेक कथा आहेत तसेच त्यांचे अवशेषही आहेत. दिमापूरचे एक नांव हिडींबापूर असेही असून या गावाचा संबंध थेट भीम व त्याची राक्षस पत्नी हिडिंबा हिच्याशी आहे. या ठिकाणी उंच उंच अशी दगडी सोंगट्यांची रांग असून ही प्यादी घेऊन भीम व घटोत्कच बुद्धीबळ अथवा सारीपाट खेळत असत असा समज आहे. पर्यटकांसाठी हे मोठेच आकर्षण आहे.


असे मानले जाते की याच ठिकाणी पांडव अज्ञातवासाचा कांही काळ राहिले होते. तेव्हा येथील हिडींब राक्षस व त्याची बहीण हिडींबा यांचे येथे राज्य होते. रात्रीच्या वेळी हिडींबा खाण्यासाठी माणसांचा शोध घेत जंगलात गेली तेव्हा झोपलेले पांडव व त्यांच्या रक्षणासाठी जागा राहिलेला भीम तिच्या नजरेस पडले. मात्र पाहताक्षणी हिडींबा भीमाच्या प्रेमात पडली व तिने पांडवांना मारले नाही. याचा राग आलेल्या हिडींबाचे भीमाबरोबर युद्ध झाले व त्यात हिडिंब मारला गेला. हिडींबेने मात्र माता कुंतीकडे भीमाबरोबर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली व परवानगी दिली नाही तर प्राणत्याग करणार असे सांगितले. त्यानंतर दोघांचे लग्न लावले गेले. भीम दिवसा हिडींबेसोबत राहिल व रात्री पांडवांबरोबर राहील अशा अटीवर हे लग्न लागले. त्यानंतर वर्षभर पांडव तेथे राहिले व त्या काळात घटोत्कचाचा जन्म झाला.

घटोत्कच हा जन्मतःच मोठा झाला व पांडवांना त्याने स्मरण करताच तुमच्या मदतीसाठी येईन असे सांगितले. त्यानुसार कुरूक्षेत्रातील युद्धात तो आला व तेथेच त्याला वीरगती मिळाली. या भागातील डिमाशा जातीचे लोक आजही त्यांना हिडींबेचे वंशज मानतात. हिडींबा नागालँड सोडून नंतर हिमाचल प्रदेशात गेली व तिथे तिला राक्षस योनीतून देव योनी प्राप्त झाल्याचाही समज असून मनाली येथे हिडींबेचे सुंदर मंदिर आहे. ती या गावची ग्रामदेवता मानली जाते. दीमापूर येथे कचहारी शासनातील अनेक सुंदर मंदिरे, तलाव, किल्ले असून येथील निसर्गसौंदर्याला तर तोड नाही.

Leave a Comment