५०० च्या नव्या नोटा फक्त एटीएम मधून मिळणार


चलन टंचाईवर मात करण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाचशे रूपयांच्या नव्या नोटांचा पुरवठा बँकाना केला गेला असून या नोटा एटीएममधूनच ग्राहकांना दिल्या जाव्यात असे आदेश रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांसाठी जारी केले आहेत. नोटबंदी जाहीर करताना पंतप्रधान मोदींनी जनतेला ५० दिवसांची मागितलेली मुदत संपण्यास आता दोन दिवसांचा अवधी आहे. आजही बँकातून रोकड मिळण्यासाठी रांगा लागलेल्या दिसत असल्या तरी येत्या दोन दिवसांत कॅलिबरेट केलेली एटीएम पुरेशा प्रमाणात नागरिकांची गरज भागवू शकतील असे सांगितले जात आहे.

बँकेतील अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार एटीएम मधूनच पाचशे व शंभराच्या नोटा ग्राहकांना दिल्या जाव्यात असे आदेश रिझर्व्ह बँकेने जारी केले आहेत. त्यामुळे बँकांमधील रांगा कमी होतील तसेच बँकांवर येत असलेला कामाचा ताण कमी होईल व नागरिकांनाही सम प्रमाणात नोटा उपलब्ध होतील असा रिझव्हॅ बँकेचा अंदाज आहे. पुण्यातील कार्यरत असलेल्या एटीएमच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असल्याचेही दिसत आहे. गेल्या आठवड्यात १० ते २० टक्के एटीएम सुरू होती ती संख्या आता ४० टक्यांवर गेल्याचे दिसते आहे. बँकांनी त्याना मिळालेल्या रोकडीतील मोठा हिस्सा एटीएममध्ये भरायचा आहे व एटीएम रिकामी राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. या संदर्भात रिझर्व्ह बँकेने आदेश जारी केले आहेत.

सध्या एटीएम मधून दिवसाला २५०० रूपये काढण्याची मुभा आहे. ही मर्यादा संपण्यास मात्र आणखी थोडी वाट पहावी लागेल असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment