शिक्कामोर्तब! जुन्या नोटा बाळगल्यास दंडात्मक कारवाई


नवी दिल्ली – जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांबाबत महत्त्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेतला असून १० पेक्षा अधिक जुन्या नोटा जवळ बाळगल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. तसेच काही ठराविक प्रकरणांमध्ये दंड भरण्याबरोबरच ४ वर्षांपर्यंत तुरुंगाची हवाही खावी लागणार आहे.

अवघे दोन दिवस बँकांमध्ये जुन्या नोटा जमा करण्यासाठी शिल्लक राहिले असून बँकांमध्ये नोटाबंदीच्या ५० दिवसांत आतापर्यंत ९० टक्के म्हणजे १४ लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत. उर्वरित १० टक्के रक्कम अद्याप जमा होऊ शकलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत जुन्या नोटा बाळगण्यासंदर्भात अध्यादेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार १० पेक्षा अधिक नोटा जवळ बाळगल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. या अध्यादेशानुसार ३० डिसेंबरनंतर १० पेक्षा अधिक जुन्या नोटा बाळगता येणार नाहीत.

३० डिसेंबरनंतर चलनातून बाद केलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा जवळ बाळगल्यास जबर दंड बसणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा अध्यादेश जारी करण्यात आला. अवघे दोन दिवस जुन्या नोटा जमा करण्यास शिल्लक राहिले आहेत. ते अद्याप बँकेत जमा झालेले नाहीत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जुन्या नोटा बाळगण्यासंदर्भात जारी केलेल्या अध्यादेशानुसार, आता उर्वरित जुन्या नोटा बँक क्षेत्रात परत येतील. त्याची आगामी २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचा ताळमेळ बसवण्यासाठी मदतच होणार आहे, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले आहे. १ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत आरबीआयच्या ठराविकच कार्यालयांमध्ये जुन्या नोटा जमा करता येणार आहेत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

Leave a Comment