बँकांचे केंद्राला साकडे; रोख रक्कम काढण्यावरील निर्बंध हटवू नका


नवी दिल्ली – देशातील बँकांनी केंद्र सरकारकडे रोख रक्कम काढण्यावरील निर्बंध उठवण्यात येऊ नये, अशी विनंती केली असून बँकांकडे जोपर्यंत पुरेशा प्रमाणात रोख रक्कम उपलब्ध होत नाही, तोपर्यंत बँक खात्यांमधून रोख रक्कम काढण्यावरील निर्बंध उठवले जाऊ नये, अशी विनंती बँकांकडून करण्यात आली आहे. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडून नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँक खात्यातून पैसे काढण्यावर निर्बंध आणण्यात आले आहेत. सध्या कोणीही व्यक्ती एटीएममधून दिवसाला २,५०० आणि बँकेतून दर आठवड्याला २४,००० रुपये काढू शकते.

सरकारने लादलेल्या या निर्बंधांवर शुक्रवारी निर्णय होण्याची शक्यता असून बँकांकडून याबद्दल चिंता व्यक्त होते आहे. सरकारने जर बँक खात्यातून पैसे काढण्याबद्दलचे निर्बंध हटवले, तर लोक मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढण्यास सुरुवात करतील. त्यामुळे आधीच रोख रक्कम कमी असलेल्या बँकांची स्थिती आणखी बिकट होऊ शकते, असे बँक अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते आहे.

पुरेशा प्रमाणात रोख रक्कम बँकाकडे उपलब्ध झाल्यावरच बँक खात्यातून पैसे काढण्यावरील निर्बंध हटवले जायला हवेत. आताच जर निर्बंध हटवले गेले, तर लोक मोठया प्रमाणात रोख रक्कम काढण्यासाठी येतील. त्यामुळे मोठे संकट निर्माण होईल, असे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. सरकारला आम्ही लिखित स्वरुपात काहीही सांगितलेले नाही. मात्र बँकेतून रोख रक्कम काढण्यावरील निर्बंध कायम असावेत, असे सांगितले असल्याची माहिती इंडियन बँक असोसिएशनने दिली आहे. इंडियन बँक असोसिएशन खासगी आणि सरकारी बँकेचे प्रतिनिधित्व करते.

३० डिसेंबरपर्यंत सर्वसामान्यांपर्यत फक्त ५० टक्के नव्या नोटाच पोहोचतील, अशी माहिती अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यामुळे तब्बल साडे पंधरा लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्या. यातील १४ लाख रुपयांच्या नोटा बँकेत जमा झाल्या आहेत.

Leave a Comment