१ लिटर पाण्यावर ५०० किमी.चालणारी बाईक


दिवसेदिवस पेट्रोल व डिझेलचे दर वाढतच जाणार असल्याने या इंधनावर चालणार्‍या गाड्या वापरताना समस्या येत राहणार आहेत. मात्र महागाईच्या समस्येवर एक उपाय ब्राझीलमधील ऑसिफर रिकार्डो अजेवेडो यांनी शोधून काढला आहे. त्यांनी सर्वसामान्यांनाही सहज परवडेल अशी बाईक तयार केली आहे. मुख्य म्हणजे ही बाईक पाण्यावर चालते व तिला पेट्रोल डिझेलची गरज नाही. १ लिटर पाण्यात ही बाईक ५०० किमी अंतर जाते असाही रिकार्डो यांचा दावा आहे.

टी पॉवर एच २० असे या बाईकचे नामकरण केले गेले आहे. ही बाईक चालविण्यासाठी कोणत्याही विशेष पाण्याचीही गरज नाही. नदी, नाले, तलाव अशा कुठल्याही अगदी घाणेरड्या पाण्यावरही ही बाईक चालते कारण तिचे डिझाईनच पाणी व एक कार बॅटरी पासून तयार केले गेले आहे. यातील बॅटरी इलेक्ट्रीसिटी तयार करून पाण्यातील हायड्रोजनचे रेणू वेगळे करते. हे रेणू पाईपातून इंजिनात येतात व बाईकला पॉवर मिळते. या बाईकमुळे पर्यावरणाचे नुकसान होत नाही तर उलट फायदाच होतो असाही दावा केला जात आहे.