स्त्री वेषातील गिरीजाबंध हनुमान


हनुमानाची कीर्ती महाबली अशी असली तरी भारतात हनुमानाचे एक मंदिर असेही आहे जेथे हनुमान स्त्रीवेशात आहेत. छत्तीसगडच्या विलासपूर येथून २५ किमी वर असलेल्या रतनपूर येथे हे प्राचीन मंदिर आहे. या गावाला महामाया नगरी म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराचा इतिहास १० हजार वर्षे जुना असल्याचे सांगितले जाते. याच गावात महामायेचेही मंदिर आहे व हनुमान मंदिराला गिरीजाबंध हनुमान मंदिर म्हणून ओळखले जाते.

हे मंदिर पौराणिक व ऐतिहासिक महत्त्वाचे आहे. असे सांगतात, रतनपूरचा राजा पृथ्वी देवजू हा त्याच्या दुखण्यामुळे अस्वस्थ होता. त्याला महारोग झाला होता. त्याच्या मनात येई, मी इतका मोठा राजा असून मी रोगी आहे. कोणत्याच उपचारांनी मी बरा होत नाही व त्यामुळे मी कुणाला स्पर्श करू शकत नाही, कुणाला दान देऊ शकत नाही. तेव्हा असल्या जगण्यापेक्षा मरण बरे. तेव्हा रात्री स्वप्नात त्याला संकटमोचन हनुमानांनी दर्शन दिले मात्र ते देवीच्या रूपात होते. रूप देवीचे पण देवी नाही, तोंड माकडाचे पण शेपूट नाही, एका हातात लाडूचे ताट तर दुसर्‍यात राममुद्रा, कानात मोठी कुंडले, मोठा मुकुट, अष्टसिंदूराचा अंगावर लेप अशा रूपातील हनुमान त्याने पाहिले. हनुमानानी त्याला तुझ्यावर प्रसन्न आहे असे सांगून रोगमुक्तीसाठी माझे मंदिर बांध, तलाव खोद व स्नान करून तेथील कुंडात माझी मूर्ती आहे ती काढून पूजा कर असे सांगितले.


राजाने त्याप्रमाणे केले. मंदिर बांधले, तलाव खोदून त्याला गिरीजाबंध नांव दिले व मूर्तीसाठी महामाया कुंडात शोध घेतला मात्र ती मिळाली नाही. तेव्हा रात्री पुन्हा त्याला हनुमान दर्शन झाले व मूर्ती तेथेच आहे, शोध असे सांगितले. राजाला स्वप्नात दिसल्याप्रमाणेच मूर्ती मिळाली. मूर्तीच्या डाव्या खांद्यावर राम तर उजव्या खांद्यावर लक्ष्मण आहे. दोन्ही पायांखाली राक्षस चिरडले आहेत. राजाने मूर्तीची मनोभावे पूजा केली व त्याचे मनोरथ जसे पूर्ण झाले तसेच येथे येणार्‍या भाविकांचे सर्व मनोरथ पूर्ण व्हावेत अशी विनंती हनुमानांना केली.

हे मंदिर देशभरात प्रसिद्ध असून येथे येणारा भाविक कधीच खाली हात परतत नाही अशी भावना आहे. म्हणजे येथे येणार्‍यांच्या सर्व मनोकामना हनुमान पूर्ण करतो अशी श्रद्धा आहे.

Leave a Comment