नोटाबंदीनंतरची कार खरेदी आयकर विभागाच्या रडारवर


नवी दिल्ली – आयकर विभागाने नोट बंदीनंतर नोव्हेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात कार विक्री केलेल्या कार विक्रेत्यांना नोटीस बजावली असून याशिवाय आयकर विभागाने कार विक्रेत्यांकडे नोटाबंदीच्या निर्णयानंतर गाड्यांची नोंदणी केलेल्या ग्राहकांची माहिती देखील मागितली आहे. ८ नोव्हेंबरनंतर कार खरेदी करुन काळा पैसा पांढरा केलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी आयकर विभागाने कार विक्रेत्यांना नोटीस बजावली आहे.

आयकर विभागाने नोट बंदीनंतर बँकेत जास्त रक्कम जमा करणाऱ्या आणि विक्रीचा आकडा जास्त दाखवणाऱ्या कार विक्रेत्यांना त्यांच्या ग्राहकांची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. ८ नोव्हेंबरनंतर गाडी खरेदी केलेल्या प्रत्येकाची माहिती आयकर विभागाने मागवली आहे. या माहितीच्या आधारे संबंधितांची चौकशी आयकर विभागाकडून करण्यात येणार आहे. नोटाबंदीनंतर कार खरेदी करणाऱ्यांना १ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान नोटीस बजावण्यात येणार आहे. याबद्दलची माहिती कार विक्रेत्यांनी आयकर विभागाला देण्यास सुरुवात केली आहे.

आम्हाला आयकर विभागाने नोटीस बजावली असून आयकर विभागाने आम्हाला ग्राहकांची माहिती देण्यास सांगितले आहे. काही लोकांनी त्यांच्याकडे असणारा काळा पैसा कार खरेदी करण्यासाठी वापरला असा संशय आयकर विभागाला आहे. काही लोकांनी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी कार खरेदी केली. मात्र काही कार विक्रेत्यांनी हे व्यवहार ८ नोव्हेंबरच्या आधीचे दाखवले असल्याचे एका कार विक्रेत्याने म्हटले आहे. कार विक्रेत्यांकडून कार खरेदी केलेल्यांची माहिती मागिवली असल्याच्या वृत्ताला आयकर विभागाने दुजोरा दिला असून नोव्हेंबर महिन्यातील विक्रीचे आकडे जास्त असणाऱ्यांना आणि अधिक रक्कम बँकेत जमा केलेल्या देशभरातील कार विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आल्या असल्याचे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment