केरळच्या तीन गोल्ड लोन कंपन्यांकडे २६३ टन सोन्याचा साठा


कोची – जगातील अनेक श्रीमंत देशांपेक्षा जास्त सोन्याचा साठा सोने तारण ठेऊन कर्ज देणा-या केरळमधल्या आघाडीच्या तीन गोल्ड लोन कंपन्यांकडे असून त्यांच्याकडे असलेल्या सोन्याच्या साठयामध्ये दोन वर्षात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. या कंपन्यांच्या ताब्यात सप्टेंबर २०१६च्या अखेरीस २६३ टन सोने होते.

एकूण २६३ टन सोन्याचा साठा मुत्थूट फायनान्स, मण्णपूरम फायनान्स आणि मुत्थूट फिनकॉर्प या तीन कंपन्यांकडे मिळून आहे. हा साठा बेल्जियम, सिंगापूर, स्वीडन आणि ऑस्ट्रेलिया या देशांकडे असणा-या सोन्यापेक्षा जास्त असून जगभरातील सोन्याच्या मागणीमध्ये भारताचा ३० टक्के वाटा आहे.

उद्या उपयोगाला येईल या मानसिकतेतून भारतात मोठया प्रमाणावर सोन्याची खरेदी केली जाते. सोन्याच्या व्यवसायात एकटया केरळामध्ये २ लाख लोक नोकरी करतात. मागच्या दोन वर्षात मुत्थूट फायनान्सकडील सोन्याच्या साठयामध्ये ११६ टनावरुन १५० टनांपर्यंत वाढ झाली आहे. सिंगापूरकडे १२७.४टन, स्वीडनकडे १२५.७टन, ऑस्ट्रेलियाकडे ७९.९ टन, कुवेतकडे ७९ टन, डेन्मार्ककडे ६६.५ टन सोन्याचा साठा आहे. मणप्पूरम फायनान्सकडे ६५.९ आणि मुत्थूट फिनकॉर्पकडे ४६.८८ टन सोन्याचा साठा आहे. तिघांकडे एकत्र मिळून २६२.७८ टन सोने आहे.

Leave a Comment