नव्या वर्षातही चलनकल्लोळ कायम!

atm
नवी दिल्ली: बँकेतून आणि एटीएममधून पैसे काढण्यावर नोटाबंदीनंतर घालण्यात आलेल्या मर्यादा या ५० दिवसांनी बंद होतील, असे सांगण्यात आले होते. मात्र पन्नास दिवसांची मुदत पूर्ण होण्यास अवघे काहीच दिवस उरले असले, तरी चलनी नोटांचे छापखाने आणि भारतीय रिझर्व बँकेला नवीन नोटांची पूर्तता करता येत नसल्याने, ३० डिसेंबरनंतरही बँक आणि एटीएममधून पैसे काढण्यावरील निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे. बँकांचे कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी नववर्षातही हे निर्बंध कायम ठेवले जावेत, असे बँकांचेही मत आहे.

एटीएम किंवा बँकेतून सध्या अडीच हजार रूपयेच काढता येतात. नोटाबंदीनंतर ५० दिवसांनी ही परिस्थीती बदलेल अशी आशा नागरिक करत असताना आता ही पैसे काढण्याची मर्यादा ५० दिवसांनंतरही लागू राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रोकडअभावी अनेक बँका दर आठवड्याला २४ हजार रुपये देण्याच्या स्थितीत नाहीत. व्यवसायासाठी पैसे काढण्याची मर्यादा २ जानेवारीपासून हटविण्यात आल्यास, मागणीनुसार बँकांना रक्कम देता येणार नाही. रोकड स्थिती सुधारल्यानंतरच हे निर्बंध शिथिल केले जाण्याची शक्यता आहे, असे अनेक बँकांना वाटते, असे सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांनीही काही दिवसांपूर्वी असेच संकेत दिले होते. जोपर्यंत बँकांत पुरेशी रोकड येत नाही, तोवर पैसे काढण्यावरील निर्बंध हटविले जाऊ शकत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले होते. बँक आणि ग्राहकांच्या भल्यासाठी हे निर्बंध आणखी काही काळ कायम राहतील, असे मत ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडेरेशनचे सरचिटणीस हरविंदर सिंग यांनीही व्यक्त केले आहे. नोटाबंदीनंतर बँक खात्यातून आठवड्याला २४ हजार रुपये, तर एटीएममधून दररोज अडीच हजार काढण्याची मर्यादा आहे. हे निर्बंध कधी हटविण्यात येतील, हे सरकार आणि रिझर्व बँकेनेही स्पष्ट केलेले नाही.

Leave a Comment