जुन्या नोटांसाठी आली समीप घटिका


नवी दिल्ली – अवघे काही दिवस मोदींच्या ५० दिवसाचा अवधी संपत आला तरी अद्यापही चलन कल्लोळ संपलेला दिसत नाही. आता केवळ पाच दिवसच जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी मिळणार असल्यामुळे आता शेवटच्या टप्प्यात सर्वांचाच गोंधळ उडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बँकांमधून रक्कम काढण्याच्या मर्यादेतही सरकारकडून वाढ करण्यात आलेली नसल्याने नोटाटंचाईची समस्या अद्यापही कमी झालेली दिसत नाही. बँका आणि एटीएममधून पैसे काढण्यावरील मर्यादा ३० डिसेंबरनंतरही कायम राहणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

जनतेकडे परिस्थिती सामान्य होण्यासाठी ५० दिवस नोटाबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितले होते. पण ५० दिवसांची मुदत पूर्ण होण्यास काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा बँकांमध्ये जमा करण्याची मुदत ३० डिसेंबरला संपत आहे. त्यानंतर बँकांमध्येही या नोटा जमा करून घेतल्या जाणार नाहीत. ज्यांच्याकडे जुन्या नोटा असतील त्यांना थेट रिझर्व्ह बँकेमध्ये ३० मार्चपर्यंत नोटा जमा करता येतील. त्यामुळे आता ३० डिसेंबरपर्यंतचे पाच दिवस जुन्या नोटाधारकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

Leave a Comment