आतापर्यंत देशभरातून सुमारे ७१० कोटींहून अधिक काळा पैसा जप्त


नवी दिल्ली – देशभरात प्राप्तिकर विभागाकडून नोटाबंदीच्या निर्णयानंतर टाकण्यात येत असलेल्या छाप्यात मोठ्याप्रमाणात काळा पैसा व बनावट नोटा मिळण्याचे सत्र अजूनही सुरूच असून नवी मुंबईपासून केरळ, पंजाब, उत्तर प्रदेश, चेन्नई, पुणे अशा देशाच्या कानाकोपऱ्यातून काळा पैसा बाळगणारे आणि बनावट नोटांचा व्यवसाय करणाऱ्यांना ताब्यात घेतले जात आहे. सुमारे ७१० कोटींहून अधिक रोकड आतापर्यंत देशभरातून जप्त करण्यात आली आहे.

दोन हजार रूपयांच्या नव्या नोटांच्या स्वरूपात सुमारे ३५ लाख रूपये व दोन किलो सोने नवी मुंबई येथील पनवेलमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. याप्रकरणी सहा लोकांना अटक करण्यात आली होती. पकडण्यात आलेल्यांपैकी चार जण पुणे येथील तर दोघे नवी मुंबईतील आहेत. याप्रकरणी प्राप्तिकर विभागाकडून तपास सुरू आहे.

अॅम्ब्यूलन्समधून ९ लाख ४२ हजारांच्या नोटांसह ५ जणांना उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे विशेष पथकाने ताब्यात घेतले होते. जप्त करण्यात आलेल्या ८ लाख २६ हजारांच्या नव्या दोन हजारांच्या नोटा होत्या. इतर नोटा या जुन्या ५०० आणि १ हजार रूपयांच्या होत्या. हरियाणा येथील कुरूक्षेत्र येथे दोन लक्झरी कारमधून १५ लाख ६८ हजार रूपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. यातील १३ लाख ३८ हजार रूपयांच्या नव्या नोटा आहेत. पोलिसांनी याप्रकरणी दोघा जणांना पकडले आहे. विशेष गर्ग आणि दीपक गर्ग असे या दोघांचे नाव असून दोघे व्यावसायिक आहेत. कुरूक्षेत्र पोलिसांनी एकाच आठवड्यात तिसऱ्यांदा नोटा जप्त केल्या आहेत.

केरळमधील कन्नूर येथेही केंद्रीय उत्पादन शूल्क विभागाने सुमारे ५२ लाख रूपयांचा काळा पैसा जप्त केला आहे. यातील बहुतांश रक्कम ही २ हजार रूपयांच्या नव्या नोटांच्या स्वरूपात आहे. मध्य प्रदेश येथील ग्वाल्हेरमध्ये पोलिसांनी बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक लाख ८० हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणार प्रिंटर, कटिंग मशीनही जप्त केले आहे. नाशिकमध्ये बनावट नोटांचा व्यवसाय करणाऱ्या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या एका स्थानिक नेत्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave a Comment