बीजिंगकरांना आता चिंता फुफ्फुसे साफ करण्याची

lungs
चीनची राजधानी बीजिंगला सध्याचे प्रदूषणाने पुरते छळले आहे. लोक चेहऱ्याला मास्क लावूनच घराबाहेर पडतात आणि घरात एयर प्यूरिफायर लावला असेल, तरच तो काढतात. त्यामुळे अनेक लोक आपली फुफ्फुसे स्वच्छ करण्याच्या चिंतेने पछाडले असून लोक मोठ्या संख्येने इतर शहरांत किंवा परदेशांत जात आहेत.

चीनमधील प्रसिद्ध पर्यटन संकेतस्थळ Qunar.com वर लोक “धुक्यापासून बचाव” आणि “आपले फुफ्फुसे धुवा”असे शब्द टाईप करून सर्च करत आहेत. कंपनीच्या प्रवक्ता मिशेला यांनीच ही माहिती दिली.

प्रदूषणाने त्रस्त झालेले बीजिंगच्या निवासी दक्षिण चीनकडे जाणारी विमानाची तिकिटे विकत घेत आहेत. अनेक लोक जपान आणि थायलंडला जाण्याची योजना बनवत आहेत. “तेथील हवेचा दर्जा उत्तम असल्यामुळे कदाचित हे घडत असावे,” असे मिशेला म्हणाल्या.

बीजिंगमधील अनेक हॉटेलांनी खोल्यांमध्ये एयर प्यूरिफायर लावले आहेत. बीजिंगच नव्हे, तर उत्तर चीनच्या अनेक शहरांमधील हॉटेलांमध्ये एयर प्यूरिफायर लावण्यात आले आहेत.

हॉटेल बुकिंगच्या एका ऑनलाईन जाहिरातीत म्हटले आहे, की “छोट्याला जंगलाची मौज अनुभवा, ताज्या हवेच्या खोलीत रहा. विशेष एयर फिल्ट्रेशन मशीनचा आनंद घ्या.”

उत्तर चीनमध्ये सध्या प्रदूषणाने कमाल पातळी गाठली आहे. धुके इतके दाट आहे, की हवाई, जमीन आणि जलमार्गाची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कारखाने आणि शाळा बंद करण्यात आल्या आहेत. चीनमधील 70 हून अधिक शहरांनी प्रदूषण धोक्याच्या पातळीवर पोचले असल्याचा इशारा नागरिकांना दिला आहे. बीजिंग शहरात वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध घालण्यात आले आहेत आणि हे निर्बंध मोडल्याबद्दल 100,000 हून अधिक चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment