बांधकाम व्यावसायिक घेत आहेत जुन्या नोटा

note
देशातील 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद होऊन सहा आठवडे उलटल्यानंतरही अनेक बांधकाम व्यावसायिक खरेदीदार व गुंतवणूकदारांकडून याच नोटा घेत आहेत, असे उघडकीस आले आहे. इतकेच नाही, तर श्रीमंत गुंतवणूकदारांकडून या नोटा घेऊन त्यातील 70 ते 75 टक्के रक्कम पुढील वर्षी परत करण्याचा वायदा करत आहेत, असेही समोर आल्याचे वृत्त बिझिनेस स्टँडर्ड या वृत्तपत्राने दिले आहे.

सेंट्रम कैपिटल या संस्थेच्या गुंतवणूकदार बँकिंग विभागाचे कार्यकारी संचालक आणि रियल एस्टेट ग्रुपचे प्रमुख अजय जैन म्हणाले, ‘अनेक डेव्हलपर असे करत आहेत (जुन्या नोटा घेत आहेत).’ केंद्राच्या अभय योजनेअंतर्गत ज्यांनी आपली बेहिशेबी संपत्ती जाहीर केली, ते बांधकाम व्यावसायिकही जुन्या नोटा घेत आहेत कारण ही रक्कम जमा करण्यासाठी त्यांच्याकडे अधिक वेळ आहे.

बांधकाम व्यवसायात बहुतेक व्यवहार रोकड रकमेनेच होतात. या व्यवहारांचे प्रमाण सुमारे एक चतुर्थांश एवढे आहे. त्यामुळे निश्चलनीकरणाचा सर्वाधिक फटका याच क्षेत्राला बसला आहे.

नोटाबंदीमुळे 2017 या वर्षात घरांची विक्री 20 ते 30 टक्क्यांनी कमी होईल, असा अंदाज फिच या रेटिंग एजन्सीने वर्तविला आहे. यामुळे अनेक बांधकाम व्यावसायिकांवरील कर्जाचे ओझे वाढण्याची शक्यता आहे. नोटाबंदीनंतर काही बांधकाम व्यावसायिक वैयक्तिक कर्जदात्यांना कर्जाच्या बदल्यात अपार्टमेंट देऊ करत आहेत, असे मुंबईतील एका गृहकर्ज कंपनीच्या मुख्य कार्याधिकाऱ्याने सांगितले.

Leave a Comment