करबुडव्या ६७.५४ लाख लोकांवर आयकर विभागची नजर

tax
वर्ष 2014-15 मध्ये मोठ-मोठ्या रकमेचे व्यवहार करूनही 2015-16 मध्ये टॅक्स रिटर्न न भरणारे आणखी 67 लाख 54 हजार जण प्राप्तिकर खात्याने निश्चित केले आहेत. या लोकांविरूद्ध खात्यामार्फत लवकरच कारवाई सुरू होणार आहे.

विविध बँका आणि अन्य आर्थिक संस्थांकडून ही माहिती मिळवण्यात आली आहे. या संदर्भातील आकड्यांचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) तपासणी केली. यात प्राप्तिकर रिटर्न न भरणाऱ्यांनी निश्चिती करण्यात आली. प्राप्तिकर खात्याच्या नॉन-फायलर्स मॉनिटरिंग सिस्टम (एनएमएस) द्वारे ही तपासणी करण्यात आली आहे. आयटी रिटर्न न भरणारे परंतु ज्यांच्याकडून कर वसूल करता येऊ शकतो, असे लोक या यंत्रणेतून शोधले जातात. सीबीडीटीच्या एका प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. आता या लोकांना नोटिसा पाठवून त्यांना आपल्या व्यवहारांचा हिशेब देण्यास सांगण्यात येणार आहे.

नोटाबंदीनंतर आतापर्यंत प्राप्तिकर खात्याने 760 हून अधिक छापे व जप्तीच्या कारवाया केल्या असून 3,590 कोटी रुपयांचे काळे धन उघड केले आहेत. खात्याने 8 नोव्हेंबरनंतर करचोरी आणि हवाला व्यवहाराबद्दल आतापर्यंत 3,589 लोकांना नोटिसा पाठवल्या आहेत. याशिवाय 500 कोटी रुपयांची रोकड व दागिने जप्त झाले आहेत. या जप्त रकमेपैकी 93 कोटी रुपये नव्या नोटांतील आहेत. शिवाय पुढील तपासासाठी सक्तवसुली संचालनालयाला 215 आणि सीबीआयला 185 प्रकरणे सोपविण्यात आली आहेत.

Leave a Comment