कधी संपणार एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा ?

sbi
मुंबई – काही दिवसांत नोटाबंदीच्या निर्णयाला ५० दिवस पूर्ण होतील. असे असले तरी आजही एटीएमबाहेर लागणाऱ्या रांगा काही कमी झालेल्या नाहीत. दिवसाला २ हजार काढायचे सरकारने ठेवलेल्या नियमांमुळे आजही नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते आहे. एटीएममधून नागरिकांना गरजेप्रमाणे पैसे काढता आले, तर स्वाभाविकपणे एटीएमसमोरच्या रांगाही संपतील. मात्र एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा संपण्यासाठी संपूर्ण जानेवारी महिना जाऊ शकतो, असा अंदाज देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने वर्तवला आहे.

एटीएमबाहेर रांगा दिसणे सध्या सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र एसबीआयने या गर्दीवर तोडगा काढण्यासाठी एक अंदाज बांधला आहे. नोटा छापणाऱ्या आणि ग्राहकांना पैसे देणाऱ्या रिझर्व बँक ऑफ इंडियाचा गेल्या सहा वर्षांचा डेटा एसबीआयने जमा केला आहे.

एका महिन्याला एका व्यक्तीला किमान किती पैसे लागतात, याचा अंदाज रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या या माहितीतून एसबीआय बांधणार आहे. आकडेवारीनुसार एक व्यक्ती सरासरी ३ हजार १४२ रुपये महिन्याला काढतो. म्हणजेच एका व्यक्तीला दररोजच्या सरासरी हिशोबाने १०३ रुपये लागतात. देशात सध्या ७७ कोटी एटीएम कार्ड आहेत. म्हणजेच सध्या देशात दररोज ८ हजार कोटी रुपयांची गरज आहे.

दररोज एवढी रक्कम एटीएममध्ये उपलब्ध असेल तरच रांगा लागणे बंद होईल. देशात एकूण २,१६,२१६ एटीएम मशिन्स आहेत. म्हणजेच प्रत्येक एटीएमला दररोज ३ लाख ७० हजार रुपयांची गरज आहे. किमान जानेवारीपर्यंत सरकार अडीच हजार रुपये काढण्याची मर्यादा हटवणार नाही, असा एसबीआयचा अंदाज आहे.

Leave a Comment