दोन लाख शौचालयांची माहिती देणार गुगल

google
नवी दिल्ली – देशात सार्वजनिक ठिकाणी लोकांना विशेषत: महिलांना शौचालय शोधताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ‘गुगल टॉयलट लोकेटर’ सुरू करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला असून अनेक वैद्यकीय अहवालांनुसार कोणत्याही पर्यायांअभावी मलविसर्जन न करू शकल्यामुळे शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, तरीदेखील देशातील अनेक लोक दररोज अशाप्रकारच्या समस्यांना सामोरे जातात. हीच गैरसोय लक्षात घेऊन गुरूवारी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते ‘गुगल टॉयलेट लोकेटर’चे अनावरण करण्यात येणार आहे.

या लोकेटरचे आगामी काळात स्वतंत्र अॅप्लिकेशन सुरू करण्याचा विचार सरकार करत असून त्यादृष्टीने काम सुरू आहे. दोन लाख शौचालयांची माहिती आतापर्यंत जमविण्यात आली असून सार्वजनिक शौचालयांची ही माहिती एकत्रित करण्यात येणार आहे. यामुळे गुगल मॅप्सच्या सहाय्याने संबंधित परिसरातील सार्वजनिक शौचालये शोधण्यास मदत होईल. या अॅपमध्ये संबंधित शौचालयाची स्वच्छता, शौचालय भारतीय किंवा पाश्चात्य पद्धतीचे आहे, मोफत किंवा शुल्क असलेले आहे, याचीही माहिती मिळणार आहे. मात्र, सध्या गुगल लोकेटरमध्ये दिल्ली राजधानी परिसर आणि मध्य प्रदेशमधील शौचालयांचीच माहिती आहे. आगामी काळात यामध्ये अन्य राज्यांतील शौचालयांच्या ठिकाणांची माहिती जमा केली जाणार आहे.

वर्षभरापूर्वी पंजाबस्थित सनदी अधिकारी विपुल उज्ज्वल यांनी केंद्रीय नगरविकास खात्याला ही कल्पना सुचवली होती. दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी या वर्षाच्या सुरूवातीला दिल्लीत हे अॅप सुरू केले होते. या अॅपमध्ये वापरकर्त्यांना संबंधित शौचालयातील स्वच्छता आणि सुविधांविषयी अभिप्राय नोंदविण्याचीही सोय उपलब्ध आहे. फाईंड एक्स टॉयलेट या नावाने सुरू करण्यात आलेले हे अॅप जीपीएस यंत्रणेद्वारे नजीकच्या परिसरातील सार्वजनिक शौचालयांची माहिती उपलब्ध करून देते. तसेच हे अॅप संबंधित शौचालयापर्यंत कोणत्या रस्त्याने जायचे, हेदेखील सांगते. या अॅपमध्ये समावेश नसलेल्या नव्या शौचालयांची माहितीही वापरकर्ते जमा करू शकतात.

Leave a Comment