काळ्या पैशांचा आकडा ५५,००० कोटीपर्यंत खाली येणार

black-money
काळा पैसा उघड करण्यासाठी केंद्र सरकारने अभय योजना जाहीर केली खरी, मात्र या योजनेअंतर्गत मिळालेल्या रकमेचा आकडा अपेक्षेपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. पूर्वी जाहीर केलेल्या 67,382 कोटी रुपयांऐवजी हा आकडा रकमेपेक्षा 55,000 कोटीपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. हैदराबाद येथील एका बांधकाम व्यावसायिकाने कर भरलेला नसल्यामुळे सरकारला ही अंदाजित रक्कम कमी करावी लागली आहे.

देशातील बेहिशेबी संपत्ती उघड करण्यासाठी केंद्र सरकारने अभय योजना जाहीर केली होती. तिची मुदत सप्टेंबर 2016 मध्ये संपली. या योजनेअंतर्गत हैदराबाद येथील एका बांधकाम व्यावसायिकाने 9,800 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता घोषित केली होती. त्याच्या दोन-तीन सहकाऱ्यांनी 2,000- 3,000 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. “या सर्वांचा कराचा हप्ता 30 नोव्हेंबरपर्यंत यायचा होता मात्र त्यांच्यापैकी कोणीही तो भरलेला नाही,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

“या संदर्भात प्राप्तिकर विभाग आवश्यक ती कारवाई करेल, मात्र आम्ही अभय योजनेअंतर्गत जाहीर झालेल्या एकूण काळ्या पैशांची रक्कम सुधारू,” असे ते म्हणाले.

सरकारने अभय योजनेखाली 67,382 कोटी रुपये जाहीर झाल्याचे म्हटले होते. त्यात हा बांधकाम व्यावसायिक व त्याच्या सहकाऱ्यांच्या रकमेचा समावेश होता. “यामुळे घोषित संपत्ती आता 55,000 कोटीपर्यंत खाली येईल,” असे हा अधिकारी म्हणाला.

अभय योजनेखाली 71 हजार 726 जणांनी 67,382 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केल्याचे सरकारने म्हटले होते. त्यात हैदराबादच्या या बांधकाम व्यावसायिक व त्याच्या सहकाऱ्यांचा समावेश होता. या बांधकाम व्यावसायिकाकडूनच 1,100 कोटी रुपयांचा कराचा पहिला हप्ता यायचा होता, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

Leave a Comment