उत्तराखंडमधील चारीधाम बोगद्याने जोडली जाणार

chardham
उत्तराखंडातील गंगोत्री, जमुनोत्री, बद्रीनाथ व केदारनाथ ही चार धाम बोगद्याच्या सहाय्याने जोडण्याच्या प्रस्तावास केंद्र सरकारने प्राथमिक मंजुरी दिली असून हे काम तीन टप्प्यात केले जाणार आहे. या प्रकल्पात आयआयटी रूरकीचे अभियंते महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहेत. या मार्गावर १०० किमी लांबीचे १४ बोगदे बांधले जाणार आहेत. यामुळे सध्या या चार धाम यात्रेसाठी कापावे लागणारे ८१३ किमीचे अंतर ३८९ किमीवर येणार आहे शिवाय हा प्रवास अधिक सुरक्षित हेाऊ शकणार आहे.

या संदर्भातला प्रस्ताव उत्तराखंड सरकारने केंद्रीय रस्ते मंत्रालयाला सादर केला असून त्या संदर्भात दिल्लीत एक बैठक नुकतीच झाली. त्यात या प्रस्तावाला मंजुरी दिली गेली आहे. अर्थात सर्वप्रथम या प्रस्तावानुसार हे सर्व बोगदे हिमालयाच्या कुशीत होणार असल्याने तेथील जमिन, खडक यांचे परिक्षण केले जाणार आहे तसेच पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचणार नाही ना याचीही खात्री करून घेतली जाणार आहे. या बोगद्यांमुळे होणार्‍या फायद्यांचा तसेच तोट्यंाचा विचारही केला जाणार आहे.

या प्रकल्पात पूर्ण हिमालय बेसिन एकमेकांशी जोडले जाणार आहे. प्रवासाचे अंतर कमी झाल्याने येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांना वीज, पाण्याच्या चांगल्या सुविधा देणे शक्य होणार आहे त्याचप्रमाणे लष्कराला गरज भासली तर या बोगद्यांचा वापर करून कमी वेळात सीमाभागात जाणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर पावसाळ्याच्या दिवसांत या भागातील शेती उत्पादने शहरांपर्यंत पोहोचविण्यासाठीही हे बोगदे उपयुक्त ठरणार आहेत.

Leave a Comment