लांबसडक केसांच्या महिलांचे गांव

jifong
सुंदर, काले, घने लंबे बाल म्हणजेच लांबसडक काळेभोर केस आपल्याला लाभावेत असे बहुतेक महिलांचे स्वप्न असते. महिलाच कशाला पण पुरूषांनाही आपल्या बायकोचे केस लांबसडक असावेत अशी अपेक्षा असते. यामुळेच तर केस काळे ठेवणार्‍या, त्यांची लांबी वाढविणार्‍या अनेक तेल, लोशन्स व औषधांचा व्यापार जगात जोरात सुरू असतो. जगात असे एक गांव आहे, जेथील माहिलांचे केस किमान ३ फूट व जास्तीत जास्त ७ फूट लांबीचे आहेत व यामुळेच या महिलांनी देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या महिलांची भेट घ्यायची असेल तर चीनच्या गुआंगशी प्रांतातील हुआंगलुओ गावाला भेट द्यायला हवी. महिलांचे केस लांब असणे येथील परंपरेशी निगडीत आहे. असे सांगतात की याओ जमातीच्या या महिला आहेत. ही जमात २०० वर्षे जुनी आहे व या गावात ६० महिला आहेत. डेलिमेलच्या वृत्तानुसार या गावची परंपरा सांभाळण्याची कामगिरी येथील ५१ वर्षीय पान जिफेंग या महिलेवर आहे. ती सांगते आमच्या गावात कोणतीही मुलगी १८ वर्षांची झाली की तिचे केस कापले जातात. यामागे ती तारूण्यात आल्याचा व लग्नासाठी योग्य झाल्याचा विचार असतो. त्यानंतर मात्र तिला केस कापता येत नाहीत. या गावातील सर्वाधिक कमी लांबीचे केसही ३ फूट आहेत तर सर्वाधिक लांबीचे केस असलेल्या महिलेच्या केसांची लांबी ७ फूट आहे.