भारतीय अर्थव्यवस्थेने पटकावले जगात पाचवे स्थान

economy
अर्थव्यवस्थेच्या आकारमानाच्या बाबतीत ब्रिटनला भारताने मागे टाकले असून भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार तब्बल १५० वर्षांमध्ये पहिल्यांदाच ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठा झाला आहे. ब्रिटनला युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्याचा फटका बसला आहे, तर भारताचा विकास दर वेगाने वाढतो आहे. या दोन्हींचा एकत्रित परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसून आला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेने १५० वर्षांमध्ये प्रथमच ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला पिछाडीवर टाकले आहे.

भारताची अर्थव्यवस्था मागील २५ वर्षांमध्ये वेगाने वाढते आहे. मात्र गेल्या वर्षभरात पाऊंडचे मूल्य घसरले आहे. या नाट्यपूर्ण बदलांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेने ब्रिटनला मागे टाकले आहे, असे फोर्ब्स मासिकाने म्हटले आहे. भारत २०२० पर्यंत सकल राष्ट्रीय उत्पन्नात ब्रिटनला मागे टाकेल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र गेल्या १२ महिन्यांपासून पाऊंडची किंमत २० टक्क्याने घसरल्यामुळे भारताने ब्रिटनला मागे टाकले आहे. ब्रिटनची अर्थव्यवस्था सध्या २.२९ ट्रिलियन डॉलर इतकी आहे. तर भारताची अर्थव्यवस्था २.३० ट्रिलियन डॉलर इतकी आहे,’ असे फोर्ब्स मासिकाने नमूद केले आहे.

भारतीय अर्थव्यवस्था २०२० मध्ये जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असेल, असे भाकीत २०११ मध्ये सेंटर फॉर इकॉनॉमिक्स ऍण्ड बिझनेस रिसर्च (सीईबीआर) या अर्थक्षेत्रातील संस्थेने केले होते. मात्र भारताने तीन वर्षांपूर्वीच हा मैलाचा दगड पार केला. यापुढे ब्रिटन आणि भारत यांच्यातील अंतर वाढत जाईल. भारताची अर्थव्यवस्था ६ ते ८ टक्क्यांच्या दराने वाढत जाईल. मात्र ब्रिटनचा विकासाचा दर १ ते २ टक्के असेल, असेही फोर्ब्सने म्हटले आहे.

Leave a Comment