एक बंगला बने प्यारा, तोही एका दिवसांत

bunglow
प्रत्येकाच्या स्वप्नात स्वतःचे घर असते. आपले घर असे असावे, तसे हवे अशा अपेक्षा असल्या तरी प्रत्यक्षात स्वप्नातले हे घर प्रत्यक्षात उतरायला किती काळ जावा लागेल हे सांगता येत नाही. त्यातून तो बंगला असेल तर मग विचारायलाच नको. म्हणजे जमीन घेण्यापासून सुरू झालेला हा प्रकल्प किती काळ चालणार हे सांगणे अवघडच.

ब्रिटनमधील व्हिलरबाय इनोव्हेशन या कंपनीने एक दिवसांत बंगला बांधण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे व गेल्या दोन महिन्यात असे ३३ बंगले त्यांनी उभारलेही आहेत. दोन बेडरूम्सच्या या बंगल्यात कुटुंबातील चार सदस्य अ्रारामात राहू शकतात. या नवीन तंत्रज्ञानानुसार बंगल्याचा पाया प्रथम बनविला जातो व लाकडात तयार केलेला संपूर्ण बंगला येथे आणून फिट केला जातो. सर्वात शेवटी छत बसविले जाते. जॉन्सन कन्स्ट्रक्शन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अँडी जॉन्सन या संदर्भात माहिती देताना सांगतात या तंत्रज्ञानाने स्वप्नातले घर प्रत्यक्षात आणणे खूपच सोपे, स्वस्त पडतेच पण ही घरे टिकायलाही उत्तम आहेत.

कंपनी कारखान्यातच बंगल्याचा साचा बनविते. त्यात घरात गरजेच्या असलेल्या सर्व बाबींचा समावेश असतो. म्हणजे वीजेसाठी वायरी, फिटींग्ज, गॅस सप्लाय, मॉड्यूुलर किचन, बाथरूम्स इतकेच नव्हे तर कपाटे, बेड, वॉर्डरोब असे फर्निचरही कंपनी देते. दोन बेडरूम्सच्या बंगल्याची किंमत अवघी ५० लाख रूपये आहे तर एक बेडरूमसाठी ४५ लाख रूपये मोजावे लागतात. ही घरे ६० वर्षे उत्तम स्थितीत राहतात.

Leave a Comment