धक्कादायकः ४ बँकांनी पाठवले १२,३५७ कोटी रुपये देशाबाहेर

note2
देशातील विविध तपास यंत्रणांनी गेल्या काही दिवसांत बँकांवर छापे टाकण्याला वेग दिला आहे. त्यामागे एक भक्कम कारण असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जानेवारी 2014 ते जून 2016 या काळात चार बँकांनी मिळून 12,357 कोटी रुपये देशाबाहेर पाठविले असल्याचे अंमलबजावणी संचालनालयाने आढळून आले आहे. हा आकडाही पूर्ण नसून केवळ चार बँकांतील पाच प्रकरणांतच आढळलेली ही रक्कम आहे. त्यामुळे यापेक्षाही कितीतरी अधिक रक्कम पाठवली गेली असल्याचा अंदाज आहे.

हे पैसे नक्की कोणाचे आहेत आणि कुठे पाठवले गेले आहेत, हे अद्याप समजलेले नाही. त्याचा तपास चालू आहे. मात्र यातील दोन गुन्हे ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या बँकेच्या विरोधात दाखल झाले आहेत. आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडौदा आणि इंडसइंड बँक यांच्या विरोधातही प्रत्येकी एक गुन्हा दाखल झाला असल्याचे टाईम्स ऑफ इंडियाने म्हटले आहे.

हे सर्व गुन्हे ‘प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट (पीएमएलए) 2002’ अंतर्गत दाखल केले गेले आहेत. यातील ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स आणि बँक ऑफ बडौदा या राष्ट्रीयकृत बँका आहेत. ‘या प्रकरणांच्या तपासातून काही बँक अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे,’ असे संचालनालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

‘या अधिकाऱ्यांनी नो-युवर-कस्टमर (केवायसी) तसेच अनिवासी सामान्य (एनआरओ) खाते बनविण्याबाबतच्या नियमांचे उल्लंघन करण्यासाठी मदत केली आहे. हे त्यांनी जाणूनबुजून केले किंवा नकळत केले आहे, याचा तपास अद्याप व्हायचा आहे,’ असे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

अनेक बँकांच्या कामकाजावर लक्ष ठेवून असल्याचे गेल्या आठवड्यात तपास यंत्रणांनी जाहीर केले होते. आपली 500 बँक शाखांवर नजर असल्याचे गुप्तचर खात्याने सांगितले होते. तसेच प्राप्तिकर खात्यानेही पहिल्यांदाच बँकांवर छापे टाकले होते. दरम्यान, रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गवर्नर एस. एस. मुंद्रा यांनीही एक निवेदन जारी केले. ‘आरबीआयचे निरीक्षक बँकांमधील विविध डेटा पॉईंट्सची तपासणी करत असून व्यवहार किंवा कामकाजात काही गफलत असल्याची शंका आल्यास तपास करून कारवाई केली जाईल,’ असे त्यांनी म्हटले आहे.

देशाबाहेर गेलेल्या 12,357 कोटी रुपयांमधील सर्वात मोठी रक्कम गेल्या वर्षी बँक ऑफ बडोदामध्ये आढळली आहे. या बँकेच्या दिल्लीतील एका शाखेतून 6,000 कोटी रुपये भारताबाहेर पाठवण्यात आल्याचे संचालनालयाला दिसून आले. गुजरातमध्ये आयसीआयसीआय बँकेच्या एका शाखेतून5,395.75 कोटी आणि महाराष्ट्रात ऑरियंटल बँक ऑफ कॉमर्सच्या एका शाखेतून दोन प्रकरणांमध्ये 56.51 कोटी रुपये तसेच याच बँकेच्या उत्तर प्रदेशमधील एका शाखेतून 600 कोटी रुपये बाहेर पाठवण्यात आले, असे तपासात आढळून आले आहे.

Leave a Comment