रद्द चलनी नोटांपासून बनतेय आकर्षक फर्निचर

furniture
भारतात ८ नोव्हेंबरला ५०० व १ हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या गेल्यानंतर शेकडो टनांचा कचरा निर्माण झाला असला तरी या नोटांपासून बनत असलेल्या फर्निचरमुळे या नोटांची स्मृती आपल्याला जपून ठेवणे शक्य होणार आहे. सर्वसाधारण पणे रद्द केलेल्या नोटा जाळून टाकल्या जातात अथवा त्यापासून विटा बनवून त्या वापरल्या जातात. दुबई न्यूजने दिलेल्या बातमीनुसार भारतातल्या या रद्द नोटांपासून दुबईत हार्डबोर्ड व फायबर बोर्ड बनविले जात असून त्याचा वापर अनेक कारणांसाठी केला जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दुबईत रिसायकलींगचे काम करणार्‍या कंपनीचे प्रमुख मयान मोहम्मद यांना भारताच्या तिरूवनंतपुरम मधील रिझर्व्ह बँक शाखेकडून रद्द झालेल्या चलनी नोटांपासून ते किती प्रमाणात रिसायकलिंग करू शकतात याची विचारणा केली गेली होती. अर्थात त्यावेळी भारतात नोटबंदी होणार आहे याची सुतराम कल्पनाही नव्हती. २० आक्टोबरला ही विचारणा केली गेली होती. म्हणजे तेव्हाच नोटबंदीचा निर्णय घेतला गेलेला होता व सरकारने नोटा जाळण्यापेक्षा रिसायकलिंग करायचा निर्णयही घेतलेला होता असे म्हणता येईल.

मोहम्मद म्हणाले आम्ही नोटांचा थर्मोकेमिकल वापरून लगदा करून तो वुड पल्पमध्ये मिक्स करतो व त्यावर प्रकिया करून त्यापासून हार्डबोर्ड व फायबर बोर्ड बनविले जातात. त्याचा उपयोग फर्निचर, आरसा फ्रेम, फोटो फ्रेम, वॉर्डरोब तसेच भिंती निर्माण करण्यासाठी केला जातो. त्यासाठी उच्च विद्युत उर्जा, वाफेचा दाब व विशिष्ठ तापमान ठेवावे लागते. या हार्डबोर्ड व फायबरबोर्डची निर्यात युरोप, अफ्रिका तसेच ऑस्ट्रेलियात केली जाते. सध्या मोहम्मद दर आठवड्याला ६० टन रद्द चलनी नोटा भारतातून नेत आहेत.

Leave a Comment