संसदीय समितीच्या प्रश्नांना सामोरे जाणार आरबीआय गव्हर्नर

urjit-patel
नवी दिल्ली – आता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची नोटाबंदीवरुन केंद्र सरकारला संसदेत धारेवर धरणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह शाळा घेणार आहेत. कोणत्या कारणांसाठी केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न मनमोहन सिंह करणार आहेत.

एका संसदीय समितीची स्थापना नोटाबंदीच्या निर्णयामागील कारणे आणि या निर्णयामागील संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना या समितीसमोर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे २२ डिसेंबरला उर्जित पटेल या समितीसमोर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

संसदीय समितीसमोर उपस्थित राहण्याची तयारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी दर्शवली आहे. यानंतर उर्जित पटेल यांच्यासाठी प्रश्न तयार करण्यास संसदीय समितीतील विरोधी पक्षांच्या खासदारांनी सुरुवात केली आहे. नोटाबंदीवर विरोधी पक्षांमधील अनेक खासदारांनी लक्षवेधी मुद्द उपस्थित केले होते. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी नोटबंदीवर अभ्यासपूर्ण भाषण केले होते. त्यामुळे संसदीय समितीच्या सदस्यांच्या प्रश्नांसमोर उर्जित पटेल यांची कसोटी लागणार आहे. माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली नोटाबंदीवरील संसदीय समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीत काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. त्या तुलनेत या समितीतील भाजपच्या नेत्यांचा अनुभव कमी आहे.

काँग्रेसकडून संसदीय समितीमध्ये मोईलींसोबतच माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, दिग्विजय सिंह, ज्योतिरादित्य सिंधीया यांचा समावेश करण्यात आला आहे. तर भाजपकडून या समितीत श्यामा चरण गुप्ता, अजय संचेती, गजेंद्र शेखावत आणि निशिकांत दुबे यांना स्थान देण्यात आले आहे.

Leave a Comment