मुस्लिमांनी दान दिलेल्या जमिनीवर बनणार जगातील सर्वात मोठे मंदिर!

temple
पटना – कंबोडिया येथे असणारे आंगकोर वाट याला जगातील सर्वात मोठे मंदिर असल्याचा मान आहे. मात्र हिंदूंचे जगातील सर्वात मोठे मंदिर बिहारमधील पूर्व चम्पारण जिल्ह्यात बनणार आहे. याचे नाव ‘विराट रामायण मंदिर’ असे असून विशेष म्हणजे अनेक मुस्लिमांनी या मंदिरासाठी आपली जमीन दान दिली आहे.

हे मंदिर 200 एकर जागेवर उभारले जाणार असून त्याची उंची 440 फूट असेल. ‘अंगकोर वाट’पेक्षा त्याची उंची दुप्पट असेल तसेच एकाच वेळेस 20000 लोक बसू शकतील, अशी सोय तिथे असेल. हे मंदिर आंगकोर वाटची नक्कल आहे, असा आक्षेप कंबोडियाने नोंदविला होता. त्यामुळे या मंदिराचे काम थांबले होते. मात्र मंदिराच्या आराखड्यात सुधारणा करून तो अडथळा दूर करण्यात आला असून पुढच्या वर्षी होळीनंतर त्याचे बांधकाम सुरू होईल.

पाटण्यातील महावीर मंदिर ट्रस्टचे किशोर कुणाल यांनी सांगितले, “विराट रामायण मंदिराबाबत कंबोडिया सरकारने आक्षेप घेतल्यानंतर आमच्या मूळ योजनेत बदल करण्यात आला आहे. होळीच्या सणानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात करण्याची आमची योजना आहे.”

या मंदिरात राम-सीता यांच्यासह एकूण 18 देवतांची मंदिरे असतील. हिंदूसह मुस्लिमांनीही मोठ्या संख्येने त्यासाठी जमीन दान केली आहे.

मंदिरांसाठी आतापर्यंत हिंदूच मदत करत आले आहेत. मात्र मुस्लिमांच्या भागीदारीमुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मंदिर बनविण्यासाठी तीन डझनांहून अधिक मुस्लिमांनी आपली जमीन दिली आहे. काही मुस्लिमांनी तर जमीन विकत घेण्यासाठीही मदत केली. मुस्लिमांची मदत झाली नसती, तर मंदिराचे हे स्वप्न पूर्ण करणे शक्य नव्हते, असे आचार्य किशोर कुणाल यांनी सांगितले.

या विराट रामायण मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे 500 कोटी रुपये खर्च होण्याची अपेक्षा आहे. हे मंदिर 2500 फूट लांब आणि 1296 फूट रूंद असेल. या विराट रामायण मंदिराचे काम 2012 साली सुरू झाले होते.

Leave a Comment