शापित बालपण

liqupr
अमेरिकेच्या बोस्टन प्रांतातील एका विद्यापीठातल्या प्राध्यापकाने शालेय मुलीच्या वाढत्या व्यसनाधीनतेचा अभ्यास केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार अमेरिकेतली बरीच शालेय मुले व्यसनाधीन झालेली आहेतच पण आजकाल मुलांच्या पाठोपाठ मुलीसुध्दा विविध व्यसनांच्या आहारी जात आहेत. त्यातल्या त्यात बोस्टन प्रांतातील शालेय विद्यार्थिनी मद्याचा वाढता वापर करत आहेत. असे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. या निष्कर्षामुळे मुलींच्या वाढत्या व्यसनाधीतेला कसा आळा घालता येईल यावर तिथे विचार सुरू झालेला आहे. १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलींमध्ये दारूचे व्यसन का वाढत आहे या संबंधाने काही युवतींच्या मुलाखती घेण्यात आल्या असता हा त्यांच्या वाढत्या नकारात्मक विचारसरणीचा परिणाम असल्याचे आढळले. आपल्याला हवी तशी आपली अंगकाठी नाही याचे वैफल्य पौगंडावस्थेतील आणि त्यापूर्वीच्या अवस्थेतील मुलींमध्ये निर्माण होते आणि त्यातून निर्माण होणार्‍या न्यूनगंडामुळे या मुली दारूच्या आहारी जातात असे तज्ञांना आढळून आले.

अमेरिकेतील मुलांची असो की मुलींची असो व्यसनाधीनता ही तिथल्या समृध्दीचा परिपाक आहे. स्वतःच्या फिगरविषयी जागरूक असणे हा सगळ्याच मुलींचा स्वभावधर्म आहे. परंतु गरीब देशातल्या अशा सडपातळ होता न आलेल्या मुली आपण सडपातळ नाही आहोत या न्यूनगंडापोटी व्यसनाधीन झालेल्या नाहीत. कोणत्याही कारणाने का होईना पण एखाद्या व्यसनाच्या आहारी पटकन जाणे हा श्रीमंतीचा परिणाम असतो. आधी श्रीमंती आणि समृध्दी आहे आणि नंतर बाकीचे विचार सुरू झालेले आहेत. एकंदरीत श्रीमंती किंवा अतीसमृध्दी ही मानसिकदृष्ट्या मानसाला अवनतीकडेच नेते की काय असा प्रश्‍न पडावा अशी काही प्रकरणे समोर येतात. भारतामध्ये केरळ आणि पंजाब या दोन राज्यात व्यसनांचे प्रमाण जास्त आहे. एक राज्य उत्तरेतले आणि एक दक्षिणेतले आहे. तेव्हा देशाच्या दोन वेगळ्या दिशांना असणारी ही राज्येच अशी व्यसनाधीन का असावीत असा प्रश्‍न सतवायला लागतो. पंजाब हे शीख समाजाचे बहुसंख्या असलेले राज्य आहे. पंजाबमधून आणि त्यातल्या त्यात शीख समाजामधून देशाच्या रक्षणासाठी लष्करात जाण्याची मोठी परंपरा आहे. परंतु आता हे प्रमाण कमी होत चालले आहे. दोन वर्षापूर्वी लष्कर भरतीच्या एका कार्यक्रमात मोठे धक्कादायक दृश्य समोर आले. लुधियाना जिल्ह्यामध्ये लष्कर भरतीचा जाहिरात सुरू होती आणि त्यादृष्टीने तिथे आलेल्या तरुणांची शारीरिक क्षमता मोजण्याचे काम सुरू होते.

या चाचणीमध्ये असे आढळून आले की एक हजार मुलांची चाचणी घेण्यात आली परंतु हजारामध्ये एकही मुलगा लष्करात भरती करण्याइतक्या शारीरिक क्षमतेचा आढळला नाही. या गोष्टीने भरतीचा प्रक्रिया चालवणारे अधिकारी मोठे चकित झाले. पंजाबमध्ये पैसा भरपूर आहे. आधीच तर हे राज्य श्रीमंत आहे. तिथली शेती समृध्द आहे. लघु उद्योगाचे जाळे मोठ्या प्रमाणावर तिथे पसरलेले आहे आणि पंजाबमधले अनेक लोक आता परदेशात जाऊन व्यवसाय किंवा नोकरी करायला लागले आहेत. इटली आणि कॅनडामध्ये तर हजारो एकर जमीन कसणारे अनेक शीख शेतकरी आहेत. तिथल्या या शेतकर्‍यांच्या समृध्दीचा एक छोटा वाटा पंजाबमध्ये येतो आणि त्या पैशामुळे पंजाबच्या आधीच्याच समृध्दीमध्ये वाढ होते. अशा रितीने जादा समृध्दी आली आणि तिच्यासाठी आपल्याला काहीच कष्ट करायचे नाहीत हे लक्षात यायला लागले की व्यसनाधीनता वाढायला लागते. केरळची कहाणी काही यापेक्षा वेगळी नाही. केरळमध्ये अनेक कुटुंबातून लोक परदेशात गेलेले आहेत. पंजाब आणि केरळमधला फरक एवढाच की पंजाबी लोक युरोप, अमेरिकेत जातात आणि केरळीयन लोक पश्‍चिम आशियायी आखाती देशात जातात.

केरळमध्येही परदेशातून पैसो येतो आणि त्यामुळे तिथेही व्यसनाधीतना वाढलेली आहे. या दोन राज्यांची खासियत अशी की तिथे घरटी एक माणूस अफिमबाज किंवा मद्यपी आहे. व्यसनांचे हे लोण लहान मुलांममध्येसुध्दा पसरत चालले आहे. त्यामुळे बचपन बचाओ आंदोलनाचे नेते नोबेल पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. भारतातली अनेक लहान मुले व्यसनाधीन होत आहेत आणि त्यांच्या पुनर्वसनाचे प्रश्‍न निर्माण झालेले आहेत असे सत्यार्थी यांनी या याचिकेत म्हटले आहे. ही याचिका दाखल करून घेताना सर्वोच्च न्यायालयानेही या समस्येची दखल घेतली असून व्यसनाने पीडित झालेल्या मुलांच्या पुनर्वसनाची ठोस योजना सरकारने आखावी असा आदेश दिला आहे. सत्यार्थी यांनी दाखल केलेल्या याचिकेत व्यसनाधिनतेमुळे मुले कशी कशी बिघडत चालली आहेत याचे विदारक चित्र रेखाटले आहे. कारण ही लहान मुले व्यसनाने केवळ बिघडतच आहेत असे नाही तर त्यांना व्यसने करण्याबरोबरच व्यसनांच्या व्यापारात ओढले जात आहे आणि त्यात गुंतल्यामुळे या मुलांचे भवितव्य पूर्णपणे अंधःकारमय झालेले आहे. अशा प्रकारच्या समस्या अमेरिकेसारख्या संस्कृतीहीन देशात असतात अशा गोड गैरसमजात आपण आपल्या संस्कृतीचे पांघरूण घेऊन झोपलो आहोत परंतु आता जागे होण्याची गरज आहे.

Leave a Comment