वाघा बॉर्डरप्रमाणेच कच्छ रणातही होणार सीमा गेट

vagha
भारत पाकिस्तानमधील सीमा अटारी येथे असलेले वाघा बॉर्डर गेट हे दोन्ही कडच्या पर्यटकांचे आवडते स्थळ आहे, त्याच धर्तीवर गुजराथेतही कच्छ रणात भारत पाक सीमेवर असेच गेट उभारले जाईल व त्याचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केला जाईल असे गुजराथचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी जाहीर केले आहे. सध्या सुरू असलेल्या कच्छ येथील रणोत्सवाचे उद्घाटन करताना त्यांनी ही घोषणा केली.

ते म्हणाले, भारत पाक सीमेवर गुजराथ राज्यातील सुईगम गावाजवळील बनसकंठा जिल्ह्यात हे सीमा गेट उभारले जाईल. हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित केले जाईल व येणार्‍या सर्व पर्यटकांना येथे उत्तम प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातील.

सध्या कच्छमध्ये रणोत्सवाची सुरवात झाली असून या उत्सवात देशातून तसेच विदेशातूनही मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. जमिनीत खूप मोठ्या प्रमाणावर क्षार असल्याने येथील जमिन पांढरी दिसते व चंद्रप्रकाशात हे वाळवंट चमकदार पांढरे भासते. या काळात येथे उंट सवारी, सफारी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. येथून पाकिस्तानमधील सिंध क्षेत्र दिसते. कच्छच्या रणाला स्वामी विवेकानंद यांनी शिकागो परिषदेला जाण्यापूर्वी म्हणजे १८९३ साली भेट दिली होती व तेव्हापासून हे रण प्रसिद्धीस आले आहे.

Leave a Comment