५० हजाराहून अधिक रक्कम जमा करताना पॅनकार्ड बंधनकारक

pan-card
नवी दिल्ली – केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर रोजी देशातील काळा पैशाला चाप लावण्यासाठी ५०० व १ हजार रूपयांच्या नोटाबंदीचा निर्णय घेतला. देशभरात आतापर्यंत सरकारच्या या निर्णयानंतर मोठ्याप्रमाणात काळा पैसा सापडला आहे. नागरिकांना आपल्या जुन्या नोटा येत्या ३० डिसेंबरपर्यंत बँकांमध्ये भरता येणार आहेत. बँकांमध्ये पैसे भरण्याचे प्रमाणही गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. बँकांतील काळा पैसा शोधून काढण्यासाठी आता या ५० दिवसांच्या कालावधीत दर दिवशी ५० हजार रूपये बँकांत भरणाऱ्यांवर प्राप्तिकर विभाग लक्ष ठेवणार असल्यामुळे जो कोणीही आपल्या बँक खात्यात ५० हजार हून अधिक रक्कम बँकेत जमा करेल त्याला आपल्या पॅन कार्डची प्रत द्यावी लागणार आहे. बँकांना तशा सूचनाच रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दिल्यामुळे आता ५० हजारहून अधिक रकमेचे व्यवहार करणाऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.

सरकारी बँकांबरोबरच सहकारी बँका, पोस्ट कार्यालय यांनाही आरबीआयने तशा सूचना दिल्या आहेत. ज्यांच्या बचत खात्यावर येत्या ५० दिवसांत २.५ लाख आणि चालू खात्यावर १२.५० लाखाहून अधिक रक्कम जमा होईल त्याची माहिती प्राप्तिकर विभागाला द्यावी लागणार आहे. येत्या ३० डिसेंबरपर्यंत अनेकजण बँकेत आपला काळा पैसा जमा करून तो पांढरा करण्याची शक्यता असल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.

Leave a Comment