जोधपूर मध्ये केले जाते रावणाचे पूजन व श्राद्धही

ravan-mandir
राजस्थानमधले एक देखणे शहर म्हणजे जोधपूर. ब्ल्यूसिटी नावाने प्रसिद्ध असलेल्या या शहरात पर्यटकांसाठी अनेक सुंदर जागा आहेत. महाल, गड, बागा यांनी परिपूर्ण असलेल्या या शहरात आणखीही एक आगळेवेगळे मंदिर आहे. या मंदिरात रावणाची पूजा होतेच पण त्याचे वार्षिक श्राद्धही येथे परंपरेनुसार केले जाते.

येथे राहणारे गोधा श्रीमाली ब्राह्मण स्वतःला रावणाचे वंशज मानतात. प्राचीन जोधपूरची राजधानी मंडोर हे रावणपत्नी मंदोदरीचे गांव. दसर्‍याला वाईट प्रवृत्तीचे दहन म्हणून रावणदहन करण्याची परंपरा देशात आहे. रावण वाईटाचे प्रतीक मानला गेला असला तरी तो विद्वान, दशग्रंथी होताच शिवाय उत्तम ज्योतिषी होता. त्याच्यात अनेक चांगले गुणही होते व म्हणून रावण वंशातील लोक त्याचे पूजन करतात तसेच पूर्वज म्हणून तर्पण करून त्याचे श्राद्धही करतात.

रावणाची कुलदेवता खरनान देवीचे जोधपूर येथे अमरनाथ मंदिराच्या परिसरातच देऊळ आहे. जगात फक्त येथेच या देवीचे देऊळ आहे. याच अमरनाथ मंदिरात रावणाची शिवपूजा करत असलेली मूर्ती आहे. शिवपूजन करणारी रावणाची जगातली ही एकमेव मूर्ती असल्याचे सांगितले जाते तसेच सासरी श्राद्धविधी होणारा रावण हा जगातला एकमेव जावई असल्याचाही समज आहे. रावणाला खीरपुरी आवडत असे म्हणून या मंदिरात पूजेवेळी हा नैवेद्य केला जातो. येथे रावणाचेही कांही वंशज आहेत. दसर्‍या दिवशी ते रावणाचा वध झाला म्हणून सुतक स्नान करून हा दिवस पाळतात. या अमरनाथ मंदिरासमोरच मंदोदरीचेही छोटे मंदिर आहे. तिच्याही हातात शिवलिंग आहे. मंडोरची कन्या म्हणून ती मंदोदरी. तीही अतिशय पुण्यवान होती व म्हणूनच पंचकन्यात मंदोदरीचाही समावेश आहे.

Leave a Comment