लग्नाची पहिली रात्र घालवली आश्रमात आणि भिक्षुकांप्रमाणे

wedding
अहमदाबाद – अहमदाबादच्या पालडी भागातील 29 वर्षांचा रोशन शाह आणि 24 वर्षांची आयुषी हे दोघेही चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. नुकतेच त्यांनी लग्न केल्यानंतर जगावेगळ्या पद्धतीने आपल्या लग्नाची पहिली रात्र साजरी केली. या दोघांनीही एका आश्रमात जाऊन भिक्षुंकाप्रमाणे राहून आपल्या संसाराचा श्रीगणेशा केला. इतकेच नव्हे तर त्यांच्या लग्नात मसालेदार व स्वादिष्ट जेवणाच्या जागी गोडविरहीत जेवण पाहुण्यांना देण्यात आले.

या संदर्भात बोलताना रोशनने एका गुजराती वृत्तपत्राला सांगितले, की संयमित जीवन जगणाऱ्या साध्वींचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही उपाश्रयात (आश्रम) गेलो होतो. त्या साध्वीजी पूर्वायुष्यात रोशनच्या भगिनी होत्या. त्यामुळे त्यांना काय भेट द्यावी, अशी पृच्छा नवपरिणित दांपत्याने केली. भौतिक जीवनाचा त्याग करणाऱ्या साधुंच्या दृष्टीने सांसारिक वस्तूंचे काही महत्त्व नसते. तेव्हा लग्नाच्या दिवशी तेल, तूप, गोड आणि मसालेदार नसलेले जेवण जेवण्याचे व्रत घेण्याचे तसेच पहिली रात्र उपाश्रयात घालविण्याची भेट साध्वींनी मागितली.

जैन धर्मियांमध्ये अनेक भाविक पर्यूषण आणि चातुर्मास पर्वात उपाश्रयात जाऊन साधक जीवनाचा अनुभव घेतात. त्यासाठी पोषो व्रत ते पाळतात. मात्र अशा प्रकारे आपल्या दांपत्य जीवनास प्रारंभ झाल्याचा या दोघांनाही आनंद आहे.

यशोविजयसूरी म. सा. आणि हंसकीर्तीसूरी म. सा. यांच्या प्रेरणेने हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. “माझ्या बहिणीने कायमसाठी संसार सोडून संयमाचा मार्ग धरला आहे. मग मी किमान एक दिवस दांपत्य जीवनाच्या सुखापासून का दूर राहू शकत नाही? हा विचार मी केला. आयुषीशी मी बोललो तेव्हा तीही याला संमत झाली. आम्ही साध्वीजींना भेट देण्याचे वचन दिले होते आणि त्याचे पालन करायचे होते. अशा प्रकारे भेट देण्याचा आम्हाला आनंदच आहे.”