वर्तमानपत्रात बांधलेले खाद्यपदार्थ कर्करोगाला कारणीभूत

newspaper
नवी दिल्ली : भारतीय अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) रस्त्यावरील विक्रेते खाद्यपदार्थ बांधून देण्यासाठी वर्तमानपत्राचा सर्रास वापर करतात मात्र, हे आरोग्यासाठी हानीकारक असून वर्तमानपत्रात बांधलेले खाद्यपदार्थ विषारी होत असून, कर्करोगाला कारणीभूत ठरणारे घटक त्यात निर्माण होत असल्याचा इशारा दिला आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी वर्तमानपत्रामध्ये खाद्यपदार्थ बांधून देण्यास मनाई करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. एफएसएसएआयने त्यानुसार मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यात म्हटले आहे, की वर्तमानपत्रामध्ये खाद्यपदार्थ बांधणे अनारोग्यकारक असून, असे खाद्यपदार्थ खाणे प्रकृतीसाठी धोकायदायक आहे. हे खाद्यपदार्थ स्वच्छतेचे निकष पाळून बनविले असले तरी हा धोका कमी होत नाही.

अन्नपदार्थ वर्तमानपत्रातील शाईमुळे दूषित होत असून, त्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. या शाईत अनेक हानीकारक जैविक पदार्थ असून, त्यांचे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहेत. या शाईमध्ये हानीकारक रंग, पिंगमेंट, बाईंडर्स, ऍडिटीव्हज्‌ आणि प्रिझर्व्हेटिव्ह आहेत. आरोग्याला वर्तमानपत्राच्या कागदामध्ये असलेले जैविक घटकही अपायकारक आहेत. कागदाचा पुनर्वापर करून तयार केलेली वृत्तपत्रे आणि कागद अथवा काडबोर्ड बॉक्‍समध्ये धातू, खनिज तेल आणि विषारी रसायने आढळतात. यामुळे पचनाच्या समस्येसोबत विषबाधाही होऊ शकते, असे एफएसएसएआयने म्हटले आहे.

वर्तमानपत्राचा वापर खाद्यपदार्थ बांधण्यासाठी तातडीने थांबविण्याची गरज आहे. याबाबत जनतेसोबत व्यावसायिकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्‍यकता आहे. विशेषत: असंघटित क्षेत्रातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना याबाबत सूचना करायला हव्यात. वृत्तपत्रांचा खाद्यपदार्थ बांधून देण्यासाठी होणारा वापर थांबावा यासाठी पावले उचलायला हवीत, असे असे एफएसएसएआयने नमूद केले आहे.

वर्तमानपत्रातून खाद्यपदार्थ बांधून दिल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्नसुरक्षा आयुक्तांनी जनजागृती करावी आणि हा वापर थांबविण्यासाठी योग्य पावले उचलावीत, असे निर्देश एफएसएसएआयने दिले आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment