नोटाबंदीच्या ३० दिवसानंतरही चलन संकटाची तीव्रता कायम

note1
नवी दिल्ली- सरकारला देशभरात रद्द झालेल्या रकमेच्या फक्त ३३ टक्केच नोटाच बाजारात आणण्यात यश आले असून नोटाबंदीचा निर्णय ८ नोव्हेंबरला जाहीर करताच तब्बल साडे पंधरा लाख कोटी रुपये मूल्यांच्या नोटा चलनातून रद्द झाल्या. मात्र आतापर्यंत याबदल्यात फक्त ५ लाख कोटी रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्यामुळे नोटाबंदीच्या ३० दिवसानंतरही चलन संकटाची तीव्रता कायम आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना फक्त ५० दिवस त्रास सहन करा, असे म्हटले होते. यातील ३० पेक्षा जास्त दिवसांचा कालावधी संपलेला आहे. म्हणजेच निम्म्यापेक्षा जास्त अवधी संपुष्टात आला असून या दिवसांमध्ये फक्त एक तृतीयांश रकमेच्या नव्या नोटा बाजारात आणण्यात सरकारला यश आले आहे.

सरकारला येत्या १८ दिवसांमध्ये तब्बल दोन तृतीयांश नव्या नोटा बाजारात आणाव्या लागणार आहेत. सध्या देशभरात चार लाख कोटी रुपये चलनात आहेत. यातील पाच लाख रुपये किमतीच्या नोटा नव्या आहेत. तर दोन लाख कोटी रुपये नोटाबंदीच्या निर्णयाआधीपासूनच बँकांमध्ये होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यापासूनच्या ३२ दिवसांमध्ये लोकांनी १३ लाखांच्या जुन्या नोटा बँकांमध्ये जमा केल्या आहेत.

साडेपंधरा लाख कोटी रुपये किमतीच्या नोटांपैकी १३ लाख कोटींच्या नोटा बँकेत जमा झाल्या आहेत. म्हणजेच जवळपास ८४ टक्के जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा बँकेत जमा झाल्या आहेत.’ पुढील २० दिवसांमध्ये नव्या नोटा चलनात आणून चलन संकटाची तीव्रता कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. साधारणत: ९ ते १० लाख कोटी रुपये चलनात असल्यास चलन तुटवडा आटोक्यात येईल, असा सरकारचा अंदाज आहे. त्यामुळे येत्या १८ दिवसांमध्ये अडीच लाख कोटी रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

सध्या देशभरात सात लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात आहेत. सध्या रिझर्व्ह बँकेकडून दिवसाकाठी १२ हजार कोटी ते १५ हजार कोटी रुपये किमतीच्या नोटा छापण्यात येत आहेत. छपाईचा हा वेग कायम राहिल्यास १२ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत जास्तीत जास्त २ लाख ८५ हजार कोटी रुपये, तर कमीत कमी २ लाख २८ हजार कोटी रुपये किमतीच्या नोटा चलनात येऊ शकतात. त्यामुळे देशभरातील चलन संकट आटोक्यात येईल, अशी अपेक्षा आहे.