निरक्षर कुंभाराने बनविला वैज्ञानिक मृतिका दीप

bird
छत्तीसगडच्या सूरगुजा प्रांतातील आरा गावचा परंपरने कुंभारकाम करणारा शिवमंगल निरक्षर असूनही त्याने वैज्ञानिक संकल्पनेनुसारचा मातीचा दिवा तयार करून आपल्या अलौकीक प्रतिभेचा साक्षात्कार घडविला आहे. कुंभारकाम हे त्याच्या घरात वाडवडीलांपासून चालत आले आहे व शिवमंगलही कुंभारकाम करूनच त्याची घरगृहस्थी चालवितो. मात्र शिवमंगलच्या हातात जादू आहे. मातीच्या भांड्यांबरोबरच तो हत्ती, घोडे असे प्रकारही फार सुंदर बनवितो पण दिवाळीसाठी त्याने पक्ष्याच्या आकाराचा जो दिवा तयार केला तो त्याच्या सर्व कलाकृतीतील सर्वोत्कृष्ट नमुना म्हणावा लागेल.

लहानपणापासून घरची गरीबी असल्याने तो शाळेची पायरीही चढू शकला नाही मात्र कुंभारकामातील त्याची प्रतिभा विलक्षण आहे. त्याने तयार केलेल्या मातीच्या या दिव्याचा आकार पक्ष्यासारखा आहे. या पक्ष्याच्या चोचीतून खाली बसविलेल्या दिव्याच्या पणतीत तेल थेंबाथेंबाने गळते व पणती पूर्ण भरली की तेल गळणे आपोआप थांबते. यात कोणतेही रहस्य नाही तर ती हवेच्या दबावामुळे होणारी कृती आहे. शिवमंगलने डोके लढवून अशी एअरसिस्टीम तयार केली आहे. त्याने तयार केलेल्या मातीच्या घंटा व शंख हेही असेच अनोखे आहेत. मातीचे हे शंख व घंटा अगदी खर्‍या घंटा व शंखांसारखा निनाद करतात.

शिवमंगलच्या या कलेची सरकारने दखल घेतली असून त्याला नागालाँड, डेहराडून, नैनिताल अशा अनेक ठिकाणी त्याची प्रदर्शने लावण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. तसेच अनेक प्रशस्तीपत्रे व बक्षीसेही शिवमंगलने मिळविली आहेत.

Leave a Comment