आता चलनात येणार दहा-वीसच्या प्लॅस्टिक नोटा

note2
जयपूर: केंद्र सरकार आता प्रायोगिक तत्वावर १० आणि २० रुपयांच्या प्लॅस्टिकच्या नोटा जरी करणार असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास मोठ्या रकमेचेही प्लॅस्टिकचे चलन व्यवहारात आणण्यात येईल; अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली. नोटाबंदीनंतर निर्माण झालेली चलन तुटवड्याची स्थिती एका आठवड्यात सुधारेल; असा दावाही त्यांनी केला.

प्लॅस्टिक चलनाची सुरुवात ऑस्ट्रेलियामध्ये झाली असून त्यानंतर सुमारे सहा देशांनी हे चलन स्वीकारले; असे मेघवाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. प्लॅस्टिकच्या चलनामुळे बनावट चलनालाही आळा बसेल; असा दावा त्यांनी केला.

नोटाबंदीनंतर ग्रामीण भागातील नागरिकांना प्रामुख्याने चलन टंचाईचा त्रास अधिक झाल्याचे त्यांनी मान्य केले. ग्रामीण क्षेत्रामध्ये बँकांचे जाळे पुरेसे प्रभावी नाही. ही परिस्थिती बदलून अधिकाधिक ग्रामीण नागरिकांना बँकींगच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा निर्धार आहे. त्यासाठी ग्रामीण भागात बँकींगच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आराखडा निश्चित करण्यात आला आहे. ग्रामीण भागात राष्ट्रीयीकृत बँकांची संख्या वाढविणे, टपाल कार्यालयाद्वारे व जिल्हा बँकांद्वारे व्यवहारांची कक्षा व्यापक करणे; त्याचबरोबर बँकींग प्रतिनिधींची संख्या वाढविणे; यावर भर दिला जात आहे; असे मेघवाल यांनी सांगितले.

कॅशलेस व्यवहारांना चालना मिळाल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल. व्याज दर आणि कर यांचे प्रमाण कमी होईल. दरडोई उत्पन्नात वाढ होईल; असा दावाही त्यांनी केला.

Leave a Comment