ममलेश्वर महादेव मंदिरात २०० ग्रॅम वजनाचा गहूदाणा

mahadevm
सुमारे २०० ग्रॅम वजनाचा गव्हाचा दाणा तोही पाच हजार वर्षांपूर्वीचा म्हणजे महाभारत काळातला पाहिलाय? नसेल तर तुम्हाला हिमाचल प्रदेश या देवभूमीची वाट पकडावी लागेल. हिमाचलच्या करसोगा घाटीतील ममेल गावात हा चमत्कार तुम्हाला ममलेश्वर महादेव मंदिरात पाहायला मिळेल. अतिप्राचीन काळातल्या या देवळात पाच हजार वर्षांपूर्वी चेतविलेली धुनी, भीमाचा ढोल, पांडवांनी स्थापलेली पाच शिवलिंगे ही पाहायला मिळतील.

हिमाचलला देवभूमी म्हटले जाते कारण या राज्याच्या कानाकोपर्‍यात प्राचीन मंदिरे आहेत. त्यातील हे ममलेश्वर मंदिर. हे मंदिर शिव पार्वती यांचे आहे. असे सांगतात की पांडव अज्ञातवासात असताना या भागात कांही काळ राहिले होते. येथील धुनीबाबतही एक आख्यायिका सांगितली जाते. या गावाजवळच्या एका गुहेत एक राक्षस होता व गावातील रोज एक व्यक्ती त्याला खाण्यासाठी लागत असे. राक्षस शांत रहावा म्हणून गावकर्‍यांनीच ही अट मान्य केली होती. पांडव ज्या घरात राहिले होते तेथील मुलाची राक्षसाकडे जाण्याची पाळी आली तेव्हा त्याची आई रडू लागली. पांडवांना त्या मागचे कारण समजल्यानंतर भीम त्या मुलाऐवजी राक्षसाकडे गेला व युद्ध करून त्याने राक्षसाला ठार केले. त्या स्मरणार्थ येथे धुनी पेटविली गेली ती आजतागायत प्रज्वलित आहे.

gahu
याच मंदिरात प्राचीन ढोल असून तो भीमाचा असल्याचे सांगितले जाते तसेच पांडवांचा २०० ग्रॅम वजनाचा गव्हाचा दाणाही पाहायला मिळतो. येथे पांडवांनी स्थापन केलेली पाच शिवलिंगे आहेत. विशेष म्हणजे या सर्व वस्तू अतिप्राचीन असल्याचा दाखला पुरातत्त्व विभागाने दिला आहे.

Leave a Comment