भारतीय लष्कर वापरणार टाटाची स्टॉर्म

tata
नवी दिल्ली – भारतीय लष्कराच्या वाहनांच्या ताफ्यात आता नव्या रेंजची एसयूव्ही सामील होणार आहेत. ३०००० पेक्षा अधिक जिप्सी लष्कराजवळ आहेत, टाटा सफारी स्टॉर्मची त्यांच्या जागी निवड करण्यात आली आहे. सध्या ३१९८ एसयूव्हीची ऑर्डर दिली जाईल आणि उर्वरित वाहनांना पुढील वर्षापर्यंत बदलले जाईल.

टाटा मोटर्स आणि महिंद्रात लष्कराकडून वाहनांची ऑर्डर प्राप्त करण्यासाठी चढाओढ होती, ज्यात टाटा मोटर्सला आघाडी मिळत असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही कंपन्यांच्या वाहनांची लष्कराने कठोर तांत्रिक चाचणी घेतली आहे.

लष्कराकडून सध्या ३१९८ वाहनांची ऑर्डर देण्यात आली असली तरी आगामी वर्षात ही मागणी १० पटीने वाढू शकते. सर्व स्थिती म्हणजेच उंच डोंगराळ भाग, हिमाच्छादित क्षेत्रापासून वाळवंट आणि दलदलीच्या भागात वाहनांची चाचणी घेण्यात आली, या चाचणीत टाटा ग्रुप यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे.

अवघड भागांमध्ये देखील सहजपणे चालण्यास आपल्या योग्यतेमुळे जिप्सी लष्कराची पसंती राहिली आहे. आतापर्यंत याचा वापर बटालियन स्तरापासून जवान आणि अधिका-यांच्या परिवहनासाठी करण्यात आला आहे. परंतु आता अशा एसयूव्हीची गरज अधोरेखित करण्यात आली, ज्यात अतिरिक्त सुरक्षा वैशिष्टय़े असतील आणि डिझेलवर ती कार्यान्वित होऊ शकेल. डिझेल सहजपणे उपलब्ध इंधन असल्याने लष्कर असे वाहन इच्छिते, जे डिझेलवर चांगली ऊर्जा देऊ शकेल. करार झाल्यानंतर टाटा मोटर्ससाठी यावर्षीची ही दुसरी मोठी ऑर्डर असेल. जानेवारीत टाटाने लष्कराला ट्रक पुरविण्यासाठी १३०० कोटीची ऑर्डर प्राप्त केली होती.

Leave a Comment