कोकणातील पर्यटन व्यवसायाला नोटाबंदीचा फटका

konkan
सिंधुदुर्ग – नोटाबंदीचा चांगलाच फटका देवगड तालुक्यातील पर्यटन व्यवसायाला बसला असून यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत २० टक्के सुद्धा धंदा झाला नाही, असे येथील पर्यटन व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याने देशभरातच पाचशे आणि हजार रुपये चलनातून बाद झाल्या आहेत. त्यात रोज रोज शासनाचे, रिझर्व बँकेचे नवीन नवीन नियम आणि निर्णय जाहीर होत आहेत. त्यामुळे ऐन पर्यटन हंगामात पर्यटकांनी सुद्धा पर्यटन केंद्राकडे पाठ फिरवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात किनारपट्टीवरच्या तालुक्यातून पर्यटन बहरले आहे. हजारो पर्यटक येथे भेटी देतात. दिवाळीच्या सुट्टीपासून येथील पर्यटन हंगाम सुरू होतो. परंतु नोटाबंदीचा निर्णय आणि त्यात सुट्ट्या पैशांची चणचण, अपुरा पतपुरवठा यामुळे देवगडमध्ये पर्यटकांची संख्या पुरती रोडावली आहे.

पैसे असून सुद्धा ते वापरता येत नसल्याने पर्यटक अस्वस्थ झाला आहे. पर्यटक आले तरी धंदा उधारीवर करावा लागत आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक त्रस्त झाले आहे. सिंधुदुर्ग हा देशातला पहिला पर्यटन जिल्हा आहे. देवगड, विजयदुर्ग, मालवण, तारकर्ली, आंबोली, वेंगुर्ले इथ दरवर्षी लाखो पर्यटक पर्यटनासाठी येतात. सध्या पर्यटन हंगाम सुरू झाला आहे. परंतु पर्यटकांचा म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नाही. नोटाबंदीची झळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या या महत्वाच्या उद्योगालासुद्धा बसली आहे असे म्हणावे लागेल.

Leave a Comment