अॅमेझॉनची आंतरराष्ट्रीय सेवा भारतात सुरु

amazon
नवी दिल्ली – लॉन्चपॅड ही आंतरराष्ट्रीय सेवा ई-व्यापार क्षेत्रातील अॅमेझॉन या कंपनीने भारतात सुरु केली असून यामुळे भारतीय स्टार्टअप कंपन्यांना आपली उत्पादने विक्री आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यास मदत होणार आहे. ही सेवा दाखल करण्यात आलेली भारतीय बाजारपेठ ही सातवी ठरली आहे. यासाठी प्रतिमाह पाच हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

यापूर्वी कंपनीने ही सेवा ब्रिटन, अमेरिका, चीन, जर्मनी, फ्रान्स आणि मेस्किको यासारख्या देशात सुरू केली आहे. या लॉन्चपॅडच्या सहाय्याने स्टार्टअप आणि उद्योजक आपली उत्पादने आंतरराष्ट्रीय पातळीवर विक्री करू शकतात. यामुळे कंपन्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरून गुंतवणूक मिळविण्यास मदत होईल असे कंपनीने म्हटले. आपल्या उत्पादनांची जागतिक पातळीवरील लोकांना माहिती होण्यासाठी फोटो आणि व्हिडिओ अपलोड करता येतील. याव्यतिरिक्त बाजारपेठ शोधण्यासाठी मदत करण्यात येणार आहे आणि अॅमेझॉनच्या जागतिक पातळीवरील सेवेचा लाभ घेता येईल.

भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया योजना, नास्कॉमच्या १० हजार स्टार्टअप्स आणि इंडियन एन्जेल नेटवर्कबरोबर यासाठी अॅमेझॉनने भागिदारी केली आहे. सध्या देशातील २५ कंपन्यांनी या सेवेचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे.

Leave a Comment