बाजारात सुरु झाली लाल हळवी कांद्याची आवक

onion
पुणे – लाल हळवी कांद्याची बाजारात आवक सुरू झाली असून नुकताच हंगाम सुरू झाला असल्याने आवक कमी आहे. मात्र येत्या पंधरा दिवसांत आवक मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

कर्नाटकातील कांद्याचा हंगाम पुढच्या आठवड्यात संपणार असल्याने नवीन कांद्याला परराज्यातून मागणी वाढेल. परिणामी दरातही वाढ होणार असल्याचा अंदाज व्यापारी रितेश पोमण यांनी व्यक्त केला. मार्केटयार्डातील कांदा विभागात काल नवीन कांद्याची सुमारे ५० ते ६० ट्रकची आवक झाली. तर जुन्या कांद्याची ४० ते ५० ट्रक आवक झाली. लाल कांद्याची आवक लोणंद, फलटण आणि नगर येथून झाली. तर जुन्या कांद्याची आवक जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड येथून झाली.

घाऊक बाजारात लाल कांद्याला प्रति दहा किलोला ५० ते ११० रुपये, तर जुन्या कांद्याला दहा किलोला ४० ते ७० रुपये दर मिळाला. जुन्या कांद्याचे दर घटत जाणार आहेत. तर नवीन कांद्याचे दर वाढत जातील, असेही पोमण यांनी नमूद केले. सद्य:स्थितीत कर्नाटकातील कांद्याचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे.

येत्या पंधरा दिवसांत राज्यातील विविध बाजारपेठेत लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत जाणार आहे. माल चांगला असल्याने मागणीही अधिक असणार आहे. सध्या लाल कांद्याला काही प्रमाणात परराज्यातून मागणी होत आहे. मात्र काही दिवसांत दक्षिण भारतातून मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार असल्याने दर चांगला मिळणार आहे.

Leave a Comment