जादूच्या तांदळाची पन्नास वर्षे

riceir8
जगभरातील लाखो लोकांना उपासमारीपासून वाचविणार्‍या भारताच्या जादूई तांदळाचा म्हणजे आयआर आठ जातीच्या तांदळाचा सुवर्ण महोत्सव साजरा केला जात आहे. आशिया त्यातही भारतात उपासमारीच्या सीमेवर असलेल्या लोकांना जगविण्यासाठी एक चांगला पर्याय या तांदळाच्या रूपाने मिळाला होता व त्यामुळेच त्याला जादूचा तांदूळ असे नांव पडल्याचे सांगितले जाते.

५० च्या दशकात देशात तसेच जगाच्या कांही भागात खाद्यान्न संकट ओढवले होते त्यावेळी भरपूर उत्पादन व तेही कमी दिवसांत देणारी तांदळाची ही जात विकसित करण्यात आली होती. या तांदळाचे आशियातील अनेक भूकेल्यांची भूक भागविली. फिलिपिन्स येथील आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेत क्रॉस ब्रिडींगच्या सहाय्याने ही जात विकसित केली गेली होती.खोल संशोधनानंतर ती जगासमोर आयआर आठ या नावाने आणली गेली व शेतकर्‍यांमध्येही ही जात फार लोकप्रिय ठरली.

आंध्रात ही जात प्रथम लावली गेली तेव्हा सर्वसाधारण तांदळाचे पीक हाती यायला १६० ते १७० दिवस लागतात त्याऐवजी हा तांदूळ १३० दिवसांत व बंपर स्वरूपात शेतकर्‍यांना उत्पादनात मिळाला. त्यावरून त्याला मिस्टर आयआर आठ असे नांवही दिले गेले.

हा तांदूळ म्यानमारमध्ये मॅग्या, मलेशियात पादीरिया, इंडोनेशियात पेटा बास आठ, मेक्सिकोत मिलागरो फिलिपिनो या नावाने ओळखला जातो. पाकिस्तान, बांग्लादेश, चीन, ब्राझील, अर्जेंटिना, श्रीलंका, तैवान, कोरिया व अमेरिकेतही या जातीचा तांदूळ आवडीने खाल्ला जातो व तो शेतकर्‍यांसाठी फायदेशीर पीक ठरला आहे. आंध्रातील एका शेतकर्‍याने सुरवातीलाच या तांदळाच्या विक्रीतून झालेल्या नफ्यात होंडा मोटरबाईक खरेदी केली होती व या तांदळाचे नांव होंडा राईस असे ठेवले होते.

Leave a Comment