घोडेबाबा मंदिरात भाविक वाहतात मातीचे घोडे, हत्ती

saraikela
झारखंडच्या जमशेदपूर पासून १० किमी वर सरायकेला येथे रस्त्याकडेलाच असलेले हाथीघोडेबाबा मंदिर हे भारतातील अशा प्रकारचे एकमेव मंदिर म्हणावे लागेल. येथे भगवान किंवा ईश्वराची पूजा अर्चा होत नाही तर घोड्याची पूजा अर्चा केली जाते व येथे येणारे भाविक मंदिरात मातीचे घोडे व हत्ती अर्पण करतात. मकरसंक्रातींच्या दुसर्‍या दिवशी येथे मोठा मेळा भरतो व देशभरातून भाविक येथे गर्दी करतात. हे मंदिर ३०० वर्षे जुने आहे व इतकी वर्षे येथे ही परंपरा पाळली जात आहे. ही परंपरा म्हणजे आस्था, श्रद्धा व विश्वासाचे प्रतीक मानली जाते.

असे सांगतात की द्वापार युगात श्रीकृष्ण व बलराम या ठिकाणी घोड्यांवरून आले व त्यांनी शेतीची सुरवात येथे केली. कांही दिवसांनी ते परत गेले मात्र त्यांच्याबरोबर आणलेले घोडे येथेच ठेवले गेले. गम्हरिया असे या भागाचे नांव आहे. ३०० वर्षांपूर्वी येथे घोडेबाबा मंदिर उभारले गेले. येथे येणार्‍या भाविकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असा समज आहे व इच्छा पूर्ण झाली की येथे मातीचे घोडे हत्ती अर्पण करण्याची प्रथा आहे.

gjoda
कांही वर्षांपर्यंत महिलांना या मंदिरात प्रवेश नव्हता मात्र आता ही प्रवेशबंदी उठविली गेली आहे. तरीही या मंदिराचे व्यवस्थापन करणार्‍या कुंभकार समाजाच्या महिला या मंदिरात जात नाहीत अर्थात अठरा वर्षांखालच्या मुली मात्र मंदिरात जाऊ शकतात. येथे नारळ व केळे प्रसाद म्हणून दिले जातात मात्र हा प्रसाद घरी नेता येत नाही तर येथेच संपवावा लागतो. संपला नाही तरी मंदिरात तो सोडून जावे लागते.

Leave a Comment