सायबर गुन्हेगारांनी चोरली भारतीय बँकांची माहिती

cyber-crime
नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या सायबर गुन्हेगारांनी आयसीआयसीआय, स्टेट बँकेसह तब्बल २६ बँकांच्या ग्राहकांची माहिती चोरल्याची माहिती अमेरिकेच्या सायबर सुरक्षा यंत्रणेने भारताला दिली आहे. ही माहिती ‘ऑनलाईन पेमेंट गेट वे’ म्हणून नोंदणी असलेल्या; मात्र प्रत्यक्षात गुन्हेगारी उद्देशाने इतरांची माहिती वापरणाऱ्या ‘फिशिंग वेबसाईट्स’च्या माध्यमातून केली जात असल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत ‘इमर्जन्सी रिस्पॉन्स कॉम्प्युटर टीम’ला देण्यात आली आहे.

अमेरिकन सायबर सुरक्षा यंत्रणेने csecurepay.com आणि nsecurepay.com अशा नुकत्याच नोंदणी करण्यात आलेल्या काही वेबसाईट्सचा शोध घेतला. या साईट्स ऑगस्ट ते ऑकटोबर २०१६च्या दरम्यान नोंदणीकृत करण्यात आल्या आहेत. त्यांचे ‘दाखविण्याचे दात’ पेमेंट गेट वे म्हणून असले तरी प्रत्यक्षात त्याद्वारे माहिती चोरण्याचं काम सुरू असून त्याद्वारेच भारतीय बँकांची माहिती चोरण्यात येत असल्याचा सायबर सुरक्षा यंत्रणेचा दावा आहे.
या वेबसाईट्सवर पैशाचे आदान प्रदान करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या बँकेचे बनावट ऑनलाईन बँकिंग पेज उघडून दिले जाते. त्यावर ग्राहकाने नोंदविलेल्या माहितीवरून पासवर्ड, वन टाईम पासवर्ड (ओटीपी) व लॉग इनशी संबंधित सर्व माहितीची चोरी केली जाते. प्रत्यक्षात ही माहिती भरल्यावर ‘लॉग इन फेल्ड’चा संदेश येतो आणि गुन्हेगार या माहितीचा गैरवापर करून खात्यावरील पैशाचा अपहार करतात.

Leave a Comment