‘अमूल’ बाजारात आणणार उंटाचे दूध

amul
नवी दिल्ली: आगामी तीन महिन्यात ‘अमूल’ उंटाचे दूध बाजारपेठेत आणणार आहे. या दुधाच्या उत्पादनाचा प्रकल्प कच्छ येथे तयार असून हे दूध ५०० मिली च्या पॅकींगमध्ये उपलब्ध होणार आहे. उंटाचे दूध बाजारपेठेत उपलब्ध करून देणारा ‘अमूल’ हा देशातील सर्वप्रथम ब्रँड’ ठरणार आहे.

सुरुवातीला केवळ अहमदाबाद येथे वितरित करण्यात येणार असून त्यांनतर गुजरातमधील अन्य शहरांमध्ये वितरणाची यंत्रणा उभारण्यात येणार आहे. देशाच्या इतर भागात मागणी आल्यास त्याचाही आढावा घेण्यात येईल; अशी माहिती ‘अमूल’चे उत्पादक असलेल्या ‘गुजरात को ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन’चे विपणन व्यवस्थापक हरदीप बंगा यांनी एका कार्यक्रमात दिली.

उंटाचे दूध बाजारात आणण्यासाठी अन्न सुरक्षा नियामक असलेल्या फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड ऍथॉरिटी ऑफ इंडियाची मान्यता मिळविण्यात ‘अमूल’ला यश आले आहे. ही मान्यता मिळाल्याने या दुधाचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू करण्यासाठी \’अमूल’ने कंबर कसली आहे. गुजरातच्या काही भागात राजस्थानात उंटाच्या दुधाचा वापर सर्वसामान्य असला तरी देशाच्या बहुतांश भागात नागरिकांना या दुधाचा फारसा परिचय नाही. मात्र सध्या खाद्यपदार्थांबाबत अधिक उत्सुकता वाढलेली असल्याने आणि ‘अमूल’ची विश्वासार्ह नाममुद्रा पाठीशी असल्याने या उत्पादनाला मोठा प्रतिसाद लाभेल; अशी उत्पादकांना आशा आहे.

Leave a Comment