अब्जावधींचा खजिना पोटात असलेली चोरों की बावडी

chor
उत्तर प्रदेशातील रोहतक जवळ असलेली चोरों की बावडी म्हणजे चोरांची विहीर इतिहासात एक खास स्थान मिळवून राहिली आहे. याच विहीरीत स्वर्गाचा झरा आहे असेही सांगितले जाते तसेच तिच्या पोटात अब्जावधीचा खजिना दडला असल्याचाही लोकांचा विश्वास आहे. या मोगलकालीन बावडीशी अनेक रहस्यकथा निगडीत आहेत. १६५८-५९ या काळात शहाजहानचा सुभेदार सैदू कलाल याने १०१ पायर्‍या असलेली एक विहीर बांधल्याचे पुरावे मिळतात.

या विहीरीत अनेक खोल्याही आहेत व या विहीरीतून निघणारी भुयारे दिल्ली, हिस्सार व लाहोर पर्यंत जातात इतकेच नव्हे तर येथे भुयारांचा भुलभुलैय्याच असल्याचे सांगितले जाते. आता ही बावडी पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे मात्र तिची म्हणावी तशी देखभाल केली जात नसल्याने ती पडीक झाली आहे. अशीही कथा सांगतात की ज्ञानी नावाचा एक चोर धनवानांना लुटत असे व ती लूट या विहीरीत टाकत असे. तसेच पोलिस मागावर आले तर विहीरीतील भुयारातून गायब होत असे. त्याने चोरलेला सर्व खजिना या विहीरीत आहे असेही मानले जाते. मात्र इतिहासकार या गोष्टीशी सहमत नाहीत. त्यांच्या मते युद्धकाळात पाण्यासाठी तसेच सैनिकांच्या विश्रांतीसाठीच ही विहीर बांधली गेली असावी.

Leave a Comment