‘तेजस’ तैनात करण्यास नौदलाचा नकार

tejas
नवी दिल्ली: भारतात स्वतंत्रपणे विकसित करण्यात आलेले ‘तेजस’ हे लढाऊ विमान विमानवाहू नौकांवर तैनात करण्यास नौदलाने नकार दिला आहे. नौदलाच्या गरज पूर्ण करण्यास ‘तेजस’असमर्थ असून त्याचे वजनही गरजेपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट करून नौदल प्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यांनी तेजसच्या तैनातीस नकार दिला. मात्र नौदलाला युद्धनौकांवर सक्षम लढाऊ विमानांची तातडीची गरज असून पुढील ५ वर्षात ‘तेजस’ला पर्यायी विमाने उपलब्ध होतील; अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सध्या नौदलाकडे मिग- २९ के ही लढाऊ विमाने उपलब्ध असून त्याचे संचालन ‘आयएनएस विक्रमादित्य’ या विमानवाहू नौकेतून करण्यात येत आहे. मात्र ‘आयएसी विक्रांत’ या संपूर्णतः: स्वदेशी युद्धनौकेवरही लढाऊ विमानांची आवश्यकता आहे. ‘तेजस’ हे नौदलाच्या निकषावर न उतरल्याने यापुढे ‘विक्रांत’वरही ‘मिग’ विमाने तैनात करण्यात येतील; असे ऍडमिरल लांबा यांनी सांगितले.

‘तेजस’ला पर्यायी विमान आवश्यक असल्याने सध्या नौदलाकडून आपल्या निकषांवर उतरणाऱ्या लढाऊ विमानांचा शोध घेतला जात आहे. मात्र जगभरात त्या दृष्टीने फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे ही विमाने नौदलाच्या ताफ्यात येण्यास ५ ते ६ वर्षांचा कालावधी लागू शकेल; असे ऍडमिरल लांबा म्हणाले. मात्र हा शोध घेण्याबरोबरच नौदलाकडून संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेला (डीआरडीओ) नौदलासाठी स्वदेशी लढाऊ विमाने विकसित करण्यासाठी प्रोत्साहनच दिले जाईल; असेही त्यांनी स्पष्ट केले.

युद्धनौकांवर आणि नौदल तळाच्या परिसरात गस्त घालण्यासाठी वैमानिकविरहित विमानांचा वापर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही ऍडमिरल लांबा यांनी नमूद केले.