जगातली सर्वात जुनी लटकती रेल्वे सेवा

mono
पर्यटनाला जायचे तर कांही हटके गोष्टी पाहायला मिळाव्यात अशी कोणाही पर्यटकाची इच्छा असते. नुसते पाहण्यापेक्षा त्या गोष्टीचा अनुभव घेता आला तर दुधात साखर पडते. अशाच एका अनोख्या प्रवासाचा अनुभव घ्यायचा असेल तर जर्मनीतील वुप्पर्टाल शहराला भेट द्यावी लागेल. जगातील सर्वात जुनी लटकती रेल्वे सेवा हे या शहराचे वैशिष्ट. आजही ही सेवा तितक्याच जोमाने सुरू आहे. १९०१ पासून ही सेवा सुरू झाली व आजही रोज सरासरी ८२ हजार प्रवासी या सेवेचा लाभ घेत आहेत. विशेष म्हणजे दुसर्‍या कोणत्याच देशात सार्वजनिक वाहतुकीसाठी या रेल्वेची कॉपी केलेली नाही असेही सांगितले जाते.

ही रेल्वे १३.३ किमीचा प्रवास करते आणि हा सारा प्रवास मोठा रोमांचकारी आहे. नदीवरून होणारा हा प्रवास ३९ फूट उंचीवरून होतो. प्रवासात २० स्टेशने आहेत आणि ही रेल्वे विजेवर चालते. इतक्या वर्षात या रेल्वेला १९९९ साली एकदाच मोठा अपघात झाला. ही रेल्वे नदीच्या पाण्यात कोसळली व त्यात ५ जण ठार झाले होते. त्यानंतर २००८ व २०१३ साली अगदी किरकोळ अपघातही झाले होते असे समजते. या रेल्वेमुळे हे गांव १९ व्या शतकाअखेर औद्योगिक प्रगतीच्या सर्वाधिक वेगावर पोहोचले होते. या शहरात रस्तेही होते पण त्याचा वापर फक्त मालवाहतूक व पायी चालण्यासाठी केला जात असे.

हा सर्व भाग पहाडी असल्याने येथे जमिनीवरील ट्राम बांधणे आव्हानात्मक होते तसेच अंडरग्राऊंड रेल्वेची उभारणीही अवघड होती त्यामुळे लटकत्या रेल्वेचा निर्णय घेतला गेला होता. जगातील ही सर्वात जुनी मोनोरल म्हणता येईल.

Leave a Comment