अर्थव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी संसदीय समितीचे उर्जित पटेलांना बोलावणे

urjit-patel
नवी दिल्ली – सार्वजनिक लोकलेखा समितीने (पीएसी) पुढील महिन्यात रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर (आरबीआय) व अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देशातील नोटाबंदीच्या निर्णयानंतर आर्थिक स्थितीवर काय परिणाम झाले हे जाणून घेण्यासाठी बोलावणे धाडले आहे. आरबीआय व अर्थ मंत्रालयाने नोटाबंदीनंतर कोणत्या उपाययोजना अवलंबल्या याची माहिती घेण्यात येणार आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. व्ही. थॉमस यांच्या अध्यक्षतेखालील पीएसी समिती सदस्यांनी गुरूवारी सर्व संमतीने हा निर्णय घेतला आहे. जानेवारी महिन्यात अर्थव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल, अर्थ सचिव अशोक लवासा आणि आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव शक्तिकांत दास यांना यासाठी बोलावण्यात येणार आहे.

उर्जित पटेल, अशोक लवासा आणि शक्तिकांत दास यांना जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बैठकीला बोलावून आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी बोलावण्याचा निर्णय पीएसीच्या बैठकीत सर्वसंमतीने घेण्यात आल्याची माहिती थॉमस यांनी दिली. बैठकीची तारीख उर्जित पटेल यांच्या उपलब्धेतनुसार निश्चित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment