सोशल मीडियात व्हायरल झाली १००० रुपयांची नोट

note
नवी दिल्ली – चलनातून ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बंद केल्यानंतर बाजारात सुट्या पैशांची कमतरता जाणवत आहे. मात्र, सरकारने या जुन्या नोटा रद्द करण्यासोबतच ५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या. बाजारात आणि नागरिकांपर्यंत हळूहळू पैसे पोहचत असले तरीही बँक आणि एटीएमबाहेर नागरिकांच्या रांगा पहायला मिळत आहेत. मात्र, असे असले तरी सध्या १००० रुपयांची नोट व्हायरल झाली आहे.

१०००ची नवी नोट नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनात येणार असल्याचे केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी जाहीर केले होते. पण त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी सध्या बाजारात १००० रुपयांची नोट येणार नसल्याचे म्हटले होते. मात्र, १००० रुपयांची नोट सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असल्याचे पहायला मिळत आहे.

सोशल मीडियात व्हायरल होणारी ही १००० रुपयांची नोट खरी आहे की एडीट करुन तयार करण्यात आली आहे? याबाबत अद्यापही कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. यापूर्वी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करण्याआधी २००० रुपयांची नवी नोट अशीच सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तसेच नोटाबंदीच्या निर्णयानंतर २००० रुपयांची नवी नोट चलनात उपलब्ध करण्यात आली. त्यामुळे आता १००० रुपयांचीही नोट बाजारात येणार का? असा प्रश्न सोशल मीडियात विचारण्यात येत आहे.

Leave a Comment