भीमाशंकर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात की आसाममध्ये?

bhima
महादेव शंकराच्या १२ प्रसिद्ध ज्योतिर्लिंगापैकी भीमाशंकर हे पुण्याजवळचे ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहे मात्र आसामातील लोकांच्या मते ते खरे ज्योतिर्लिंग नाही कारण भीमाशंकरचे ज्योतिर्लिंग आसामातील गुवाहाटी जवळच्या पहाडात व दाट जंगलात आहे. त्यांच्या या दाव्यासाठी ते शिवपुराणाचा दाखला देतात. आसामचा राजा शंकरदेव हा विष्णुभक्त होता व त्यामुळे त्याच्या काळात राज्यात शिवभक्ती कमी झाली व त्यामुळे हे ज्योतिर्लिंग विस्मरणात केले असे त्यांचे म्हणणे आहे.

या लिंगाचे दर्शन घ्यायचे असेल तर कामरूप म्हणजेच आसामच्या देखण्या पर्वतरांगा ओलांडून जंगलातील निर्जन स्थानी जावे लागते. येथे भोलेनाथ भव्य रूपात पहाडी नदीच्या मध्यातच विराजले आहेत. या लिंगावर २४ तास जलाभिषेक होत असतो व पावसाळ्यात तर ते नदीत बुडतेच. येथे आदिवासी पुजारी आहेत व ते नित्यनेमाने कोणताही गाजावाजा न करता येथे पूजा व प्रार्थना करत असतात. काशीतील अनेक संत व शिवभक्त या ठिकाणी येऊन साधना करतात. शिवपुराणात जसे वर्णन केले आहे तसेच हे स्थान आहे.

या मागची कथा अशी की भीम नावाचा राक्षस त्याच्या आईसोबत जंगलात राहात होता. त्याने आईला त्याचे वडील कोण होते व त्यांनी आपल्याला असे जंगलात का टाकले असे विचारले तेव्हा आईने लंकाधिपती रावण याचा भाऊ कुंभकर्ण हे त्याचे वडील असल्याचे सांगितले. विष्णुने रामावतार घेऊन राम रावण युद्धात कुंभकर्णाचा वध केल्याचेही आईने सांगितले तेव्हा चिडलेल्या भीमाने विष्णुचा सूड घ्यायचा निश्चय केला व ब्रह्माची घनघोर उपासना करून त्याच्याकडून वर मिळविले.

त्यानंतर बेफाम झालेल्या भीमाने त्रिभुवनात नुसता हैदोस मांडला. इंद्राचा पराभव करून स्वर्ग जिंकला व कामरूपेश्वर येथील शिवलिंग तलवारीने तोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा महादेव प्रकट झाले व त्यांनी युद्ध करून भीमाची राख केली. अर्थात त्याची आठवण कायम राहवी म्हणून महादेवाने भीमाशंकराचे रूप घेऊन येथे कायमचा वास केला असे मानले जाते.
———

Leave a Comment