८३ उपग्रहांचे एकाच रॉकेटमधून प्रक्षेपण करणार इस्रो

isro
नवी दिल्ली – जानेवारीत ८३ उपग्रह भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) अवकाशात सोडणार असून तब्बल ८१ उपग्रह यामध्ये परदेशी असणार आहेत, तर दोन उपग्रह भारताचे असणार आहेत. तब्बल ८३ उपग्रहांचे एकाच रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपण करुन जागतिक विक्रम करण्याची संधी भारताला असणार आहे. एँट्रिक्स कॉर्पोरेशनमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने याबद्दलची माहिती दिली आहे.

उपग्रह प्रक्षेपणातून कंपनीला ५०० कोटी रुपये मिळणार आहेत. तर आणखी एका नव्या उपग्रह प्रक्षेपणासाठी कंपनीला ५०० कोटी रुपये मिळू शकतात. मात्र यासाठीच्या वाटाघाटी अद्याप पूर्ण व्हायच्या असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आम्ही एकाच रॉकेटच्या माध्यमातून ८३ उपग्रह प्रक्षेपित करणार आहोत. यातील बहुतांश उपग्रह हे परदेशी असतील, अशी माहिती एँट्रिक्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राकेश सासीभूषण यांनी दिली आहे. एँट्रिक्स कॉर्पोरेशनकडे इस्रोच्या व्यावसायिक विभागाची जबाबदारी आहे.

इस्रोकडून ८३ उपग्रह एकाच कक्षेत सोडले जाणार आहेत. त्यामुळे रॉकेट चालू किंवा बंद करावे लागणार नाही. सर्व उपग्रह प्रक्षेपित होईपर्यंत रॉकेट त्याच कक्षेत कायम राखणे, हे या मोहिमेतील मोठे आव्हान असेल. यासाठी इस्रोकडून ध्रुवीय उपग्रह सोडणाऱ्या यंत्रणेचा वापर करण्यात येईल, अशी माहिती एँट्रिक्स कॉर्पोरेशनकडून देण्यात आलेली आहे. एकाचवेळी अनेक उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याची कामगिरी याआधीही अनेकदा इस्रोने केली आहे.

Leave a Comment